नवी मुंबई : शहरातील बांधकाम व्यावसायिकांची मनमानी वाढत असून एकीकडे शहरात बांधकामासाठी ब्लास्टिंगचा मनमानी वापर करत असल्याचे चित्र वाशी, सीवूड्स विभागांत पाहायला मिळत असताना नवी मुंबई महापालिका मात्र या प्रकारांकडे काणाडोळा करत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. तर सीवूड्स पूर्व भागात अमोर या बांधकाम व्यावसायिकाने चक्क पालिकेच्या पदपथावरच अनधिकृत कार्यालय थाटले असून पालिकेचा पदपथच गिळंकृत केल्याचे पाहायला मिळत आहे.

या बांधकाम व्यावसायिकाच्या बांधकामामुळे शेजारील इमारतीच्या सुरक्षा भिंतीलाही तडे गेले असून स्थानिकांनी पालिकेकडे तक्रार करुनही पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाची कामे चालू असून सीवू्ड्स पामबीच मार्गालगत तसेच वाशी, नेरुळ, बेलापूर, कोपरखैरणे विभागांत बांधकाम व्यावसायिकांची पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मनमानी सुरु आहे. सीवूड्स पश्चिमेला अनेक सिडको वसाहती आहेत. त्या ठिकाणी पुनर्विकासाची तसेच नवीन इमारतींची कामे सुरु असून नागरिकांना सातत्याने होणाऱ्या ब्लास्टिंगचा त्रास होत असून शेजारील इमारतींनाही इजा पोहचत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : दोन दिवस कमी दाबाने पाणी, मोरबे मुख्य जलवाहिनीवर आज १० तास देखभाल दुरुस्ती; नवी मुंबईसह कामोठे, खारघरलाही फटका

सीवूड्स पूर्वेला सेक्टर २५ येथे अमोर बिल्डरचे बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचे बांधकाम करताना सततच्या ब्लास्टिंगमुळे शेजारील इमारतीच्या संरक्षक भिंतीलाही तडे गेले आहेत. बांधकाम करण्यासाठी पालिकेने ठरवून दिलेल्या वेळेतच काम करणे अपेक्षित असताना मनमानी पध्दतीने अवेळी काम सुरु असल्याच्या तक्रारी नागरीकांनी पालिका कार्यालयाकडे केल्या आहेत. याच बांधकाम व्यावसायिकाने बांधकामाच्या ठिकाणी चक्क महापालिकेच्या पदपथावरच आपले कार्यालय थाटले आहे. त्यामुळेपदपथच गिळंकृत केला आहे. याच विभागात विविध शाळा असून याच इमारतीच्या लगत शाळेचे मैदानही आहे. सीवूड्स रेल्वेस्थानकातून हजारो विद्यार्थी या ठिकाणाहून जात असताना अनधिकृतपणे कार्यालय थाटून पदपथ निधंकृत करण्यात आला आहे. याच विभागातून अनेक नागरीक पारसिक हिलच्या दिशेने मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात असतात.पदपथावरच कार्यालय थाटल्यामुळे नागरीक ,विद्यार्थी यांना भर रस्त्यातूनच चालत जावे लागते. त्यामुळे पालिका बेलापूर विभाग कार्यालय या अतिक्रमणाकडे का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

हेही वाचा : उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ

पालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामाची पाहणी करुन बेकायदेशीरपणे पदपथावरच थाटलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

शशिकांत तांडेल सहाय्यक आयुक्त, बेलापूर विभाग

सीवूड्स येथील अमोर बिल्डर्स या बांधकाम व्यावसायिकाने पदपथावरच अनधिकृत कार्यालय थाटल्याने पादचाऱ्यांना त्रास होत असून पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा : समाज माध्यमांतील जाहिरातींच्या आधारे सट्टा बाजारात गुंतवणूक करताय? सावधान! होऊ शकते फसवणूक

सदर इमारत बांधकामाच्या ठिकाणी पाईलिंगचे काम सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरुपात असलेले कार्यालय पदपथावर पुढे आले आहे. पाईलिंगचे काम होताच आतील बाजूला कार्यालय हलवण्यात येईल. त्याचप्रमाणे शेजारील इमारतीच्या संरक्षक भिंतीलाही तडा गेला आहे. याबाबत व इतर ठिकाणची दुरुस्तीही करून दिली जाणार आहे.

अंकित सिंग, साईट सुपरवायझर अमोर बिल्डर