उरण : येथील शेतीचे समुद्राच्या पाण्यापासून संरक्षक असलेली बांधबंदिस्ती कमकुवत झाली आहे. त्यामुळे भरतीच्या वेळी ती फुटून समुद्राचे पाणी भातशेती व मिठागरात शिरू लागलं आहे. परिणामी शेकडो एकर जमिनी नापिकी होत आहेत. परिणामी शेतात उगवलेल्या खारफुटी (कांदळवन) यामुळे शेतकऱ्यांना आपला जमिनीवरील मालकी हक्क गमावण्याची वेळ आली आहे. यामध्ये सिडको, खारभूमी विभाग आणि कृषिविभागही सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. या विरोधात आता शेतकरी आपला जमिनीचा हक्क अबाधित राहावे यासाठी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. यामध्ये उरण आणि उलवे तसेच पनवेल तालुक्यांतील अनेक ठिकाणच्या किनारपट्टीवरील शेतकऱ्यांवर आपल्या वंशपरंपरागत शेतजमिनी हातच्या जात असल्याने शासनाने निसर्ग आणि कांदळवन यांचे संरक्षण करावे मात्र शेतकऱ्यांच्या शेतीचाही हक्क कायम ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

उरणमधील वाढते औद्याोगीकरण आणि नागरीकरण यामुळे उरण तालुक्यातील मूळ शेती व मिठागरे नामशेष होण्याच्या मार्गावर असतानाच आत्ता फुटक्या खार बंधिस्तीमुळे उर्वरित शेती व मिठागरात समुद्राच्या भरतीचे पाणी शिरू लागले आहे. उरण तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन सिडकोने यापूर्वीच संपादित केली असल्याने उरण पश्चिम विभागातील संपूर्ण शेती संपुष्टात आली आहे. तर उरण पूर्व भागातील शेतजमिनीदेखील औद्याोगीकरणासाठी विकल्या जात असल्याने येथील निम्मी शेती नष्ट झाली आहे.

हेही वाचा : दोन दिवस कमी दाबाने पाणी, मोरबे मुख्य जलवाहिनीवर आज १० तास देखभाल दुरुस्ती; नवी मुंबईसह कामोठे, खारघरलाही फटका

पूर्व भागातील उर्वरित हजारो एकर शेतजमीन खारबंधिस्ती फुटल्यामुळे नापिकी झाली असून येथे शेती करणे मुश्कील झाले आहे. खोपटे गावाजवळील खारबंधिस्ती फुटल्याने या पट्ट्यातील हजारो एकर शेतजमिनीत पाणी शिरले असून हे पाणी सध्या खोपटे गावातील घरांपर्यंत पोहचले आहे. खोपटे ते गोवठणेदरम्यान असलेल्या मिठागरांच्या खारबंधिस्तीला खांड गेल्याने हे पाणी शेतात शिरले आहे.

मागील दोन वर्षांपासून ही खांड बुजली नसल्याने या परिसरातील शेतांमध्ये खारफुटी तयार झाली असून भात शेती करणे तर मुश्कील झाले आहे, शिवाय ही खारफुटी न्यायालयाच्या परवानगीशिवाय तोडता येत नसल्याने शेतकऱ्यांवर वेगळे संकट निर्माण झाले आहे. ही खारफुटी जर वेळीच तोडली नाही तर येथे कांदळवन तयार होण्याचा धोका आहे. यामध्ये करंजामधील चाणजे येथील ३०० एकर, आवरे-गोवठणे येथील ३०० एकर त्याचप्रमाणे न्हावा खाडी आदी परिसरातही शेकडो एकर जमिनीत खारफुटी आली आहे. त्यामुळे उरण पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे लवकरात लवकर करून घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : समाज माध्यमांतील जाहिरातींच्या आधारे सट्टा बाजारात गुंतवणूक करताय? सावधान! होऊ शकते फसवणूक

कित्येक वर्षे खारबंधिस्त्यांची दुरुस्तीच नाही

चार वर्षांपूर्वी पुनाडे येथील खारबंधिस्ती फुटल्याने या भागातील हजारो एकर शेती नापिकी झाली आहे. पिकत्या शेतांमध्ये कांदळवन तयार झाले आहे. आता खोपटेची परिस्थिती तशी होण्याच्या मार्गावर आहे. उरण तालुक्याला मोठा समुद्रकिनारा आणि खाड्या आहेत. त्यामुळे या तालुक्यातील बहुतांश शेती ही खाडीकिनारी आणि समुद्रकिनारी आहे. त्यामुळे या शेतांमध्ये पाणी येऊ नये म्हणून उरण तालुक्यात शेकडो किलोमीटर लांबीची खारबंधिस्ती आहे. मात्र गेली कित्येक वर्षे या खारबंधिस्त्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे उधाणाच्या पाण्यात हे बांध फुटतात आणि खारे पाणी शेतात शिरते.

हेही वाचा : पनवेल : रंगपंचमीत दोन गटातील हाणामारीत पोलिसांना धक्काबुक्की

आवाज उठवण्याची मागणी

स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ मिलिंद ठाकूर यांनी केली आहे. खोपटे गावाजवळ जी खारबंधिस्ती फुटली आहे ती मिठागरांच्या हद्दीत येते त्यामुळे ती दुरुस्ती करता येत नाही. ही फुटलेली खारबंधिस्ती दुरुस्त करावी आणि जमिनी वाचवाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.