नवी मुंबई : नवी मुंबईतील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने सलग सहा तास पाणी वितरणाची व्यवस्था सुरू केली असली तरी अजूनही शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईच्या तक्रारी कायम असल्याचे चित्र आहे. नेरुळ परिसरातील सारसोळे, वाशीतील काही सेक्टर तसेच ऐरोली, दिघा भागांत अजूनही मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठ्यासंबंधी तक्रारी पुढे येत असल्याने महापालिकेचे पाणी वितरण नियोजन विस्कटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शहरात प्रथमच एकाच वेळी सलग ६ ते ७ तास पाणीपुरवठा करण्यास महापालिकेने सुरुवात केली असली तरी या नव्या नियोजनाविषयीदेखील नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मोठ्या वसाहतींमध्ये तसेच पाणी साठवणुकीची क्षमता असलेल्या संकुलांमध्ये सलग सहा तासांचे हे नियोजन उपयोगी ठरत असले तरी सिडकोच्या जुन्या वसाहती तसेच बैठ्या घरांमध्ये एकाच वेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल नागरिकांमधून नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा : उरण – खारकोपर लोकलच्या कामांना वेग, मध्य रेल्वेच्या उपव्यवस्थापकांकडून कामाची पाहणी
वाशी परिसरातील दोन मोठ्या जलकुंभांची कामे सुरू असल्याने या विभागात अजूनही पाणीपुरवठ्याची ही नवी व्यवस्था अमलात आणली गेलेली नाही. असे असले तरी वाशी सेक्टर २, ३, १५ यांसारख्या विभागांमधील सिडको वसाहतींमधील आठवड्यातील काही दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यासंबंधी वारंवार तक्रारी करूनही अभियांत्रिकी विभागाकडून ठोस उपाय हाती घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नव्या नियोजनानुसार वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यानुसार बेलापूर, नेरुळ, सीवू्डस, सानपाडा, तुर्भे विभागांत पहाटे ४.३० ते सकाळी ११.३० पर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे, तर घणसोली विभागात संध्याकाळी ८.३० ते रात्री २ वाजेपर्यंत तसेच ऐरोली व दिघा विभागात पहाटे २ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे. हे नवे नियोजन आखताना महापालिकेने नागरिकांना कळेल अशा पद्धतीची कोणतीही व्यवस्था उभी केलेली नाही.
हेही वाचा : पनवेल पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करातून २०० कोटी जमा
पाणीपुरवठ्याच्या बदललेल्या वेळासंबंधी प्रसारमाध्यमातून रहिवाशांना कळविणे गरजेचे होते. मात्र अशा स्वरूपाची कोणतीही माहिती महापालिकेकडून प्रसारित झालेली नाही, अशी तक्रार सानपाडा भागातील रहिवासी पीयूष पटेल यांनी केली. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर असला तरी नागरिकांना कळणार कसे, असा सवाल नेरुळ सेक्टर १९ येथील हरीश कोटियन यांनी केला.
जुन्या, बैठ्या वसाहतींमध्ये हाल
नव्या वेळापत्रकामुळे सलग सहा तास पाण्याचा पुरवठा होत असला तरी ज्या ठिकाणी वसाहतींमधील साठवण क्षमता उपलब्ध नाही अशा जुन्या सिडको आणि बैठ्या घरांच्या वसाहतींमधील रहिवाशांची मात्र त्रेधा उडू लागली आहे. या वसाहतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना सकाळ किंवा सायंकाळ यापैकी एका वेळेत पाणी भरणे शक्य झाले नाही तर दुसऱ्या वेळेचा पर्याय उपलब्ध असायचा. नव्या वेळापत्रकात सलग सहा तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याने हा पर्याय आता उपलब्ध होत नाही, अशी माहिती कोपरखैरणे येथील माथाडी वसाहतीत वास्तव्य करणाऱ्या रंजना धनावडे यांनी दिली.
“सीवूड्स विभागात दोन वेळा पाणी येत होते. आता एकाच वेळी पाणी येणार आहे. सीवूड विभागात सिडकोने ज्या सर्वात आधी वसाहती उभारल्या आहेत तेथील टाक्यांची पाणी साठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे सायंकाळी पाणी आले नाही की त्रेधा उडते.” – जगदीश नरे, नागरिक, सीवू्डस
“वाशी विभागात सलग पाणीपुरवठा होणार असेल तर चांगले आहे; परंतु ज्या वेळी पाणीपुरवठा होईल तेव्हा तो योग्य दाबाने व्हायला हवा. पहाटेपासून सकाळी अधिक वेळ पाणी मिळणार असेल तर चांगलीच बाब आहे.” – नितीन इंदलकर, स्थानिक रहिवासी, सेक्टर १०