नवी मुंबई – शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून शहरात अनेक ठिकाणी देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नवी मुंबई शहर मात्र प्राचीन काळापासूनच देवींचे वारसास्थळ म्हणून संबोधले जाते. नवी मुंबईच्या शहरातील अनेक गावांमध्ये ही प्राचीन देवींची मंदिरे आढळून येतात. यातीलच नवी मुंबईतील पेशवेकालीन ‘आई गोवर्धनी’ ग्रामदेवीचे मंदिर सर्वात महत्त्वाचे मानले जाते. बेलापूर शहरातील किल्ले गावठाण येथे हे मंदिर असून नवरात्रोत्सवात मोठा उत्सव पार पडत असल्याचे लेखक गजानन म्हात्रे यांनी सांगितले.
गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवदेखील सर्वांचा आवडता उत्सव आहे. आश्विन महिन्यातील नवरात्र भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आश्विन महिन्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीच्या साडेतील शक्तिपीठांवर भाविक दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे धार्मिक स्थळांवर गर्दी होत असते. तसेच या दिवसात दांडिया, गरबा असे खेळ खेळले जातात.
विविध मंडळांत देवीच्या विविध रूपांच्या मूर्तीची स्थापना केली जात असते, तसेच पारंपरिक देवीच्या मंदिरातही नागरिक दर्शनासाठी जात असतात. धार्मिक स्थळांवरील देवीसोबतच नवी मुंबई शहरदेखील प्राचीन काळापासूनच देवींचे वारसास्थळ आहे. या शहरातील विविध भागांत ऐतिहासिक देवींचे स्थान असल्याचे नवी मुंबईतील लेखक गजानन म्हात्रे यांनी सांगितले. तसेच त्यांनी नवी मुंबईतील विविध ऐतिहासिक देवींचे महत्त्व, स्थापना आणि स्थान याबाबत माहिती दिली.
ग्रामदेवी/ गांवदेवी (किल्ले गावठाण, बेलापूर – गोवर्धनी)
दहाव्या, बाराव्या शतकात जेव्हा गावे वसली गेली तेव्हा ग्रामदेवी/ गांवदेवीची स्थापना करण्यात आली. या ग्रामदेवतेसमोर डोंबारी, गारुडी यांचे खेळ चालत. ज्यातून त्यांचा उदरनिर्वाह आणि गावातील लोकांचे मनोरंजन होत, तसेच प्रत्येक गावाची वेगवेगळी ग्रामदेवता असून त्यांची जत्रा भरविली जाते. ही ग्रामदेवता गावाचे संरक्षण करते अशी धारणा होती.
मरीआई देवी – जुहू गाव, वाशी
ग्रामीण भागात पटकी, खरूज, नारू यांसारखे त्वचारोग होत असत. त्या रोगापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी मरीआईची स्थापना करण्यात आली. नवरात्रीत यादेवीची प्रामुख्याने पूजा केली जाते. मरणावर नियंत्रण ठेवणारी देवी म्हणूनदेखील या देवीला संबोधले जाते, तसेच करोनाकाळातही या मरीआईची मोठी पूजा करण्यात आली होती. एका गावात या देवीचा गाडा (पालखी) फिरवली जाते. तेथून ती दुसऱ्या गावात नेण्यात येते. यामागे गावातील रोग पालखीसोबत नाहीसे होतात अशी धारणा होती. तर देवीसोबत यमाई देवी असते.
नागदेवी – करावे गाव
साप, नाग हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, त्यांना विनाकारण हानी पोहोचवली जाऊ नये, त्यांच्या संरक्षणासाठी नागदेवीची स्थापना करण्यात आली होती. पामबीचपासून काही अंतरावर या देवीचे मंदिर आहे.
खांडूबाई रानदेवी
जंगलात सरपण तोडायला जात असताना हिंस्र प्राण्यापासून बचाव व्हावा यासाठी रानदेवीची पूजा केली जाते. . खिंडीजवळ रान असल्याने त्या देवीस खांडूबाई रानदेवी संबोधले जाते.
करंजा देवी – शिरवणे गाव
पेरणी, नागंरणी अशी शेताची कामे सुरू झाली की शेतीची कामे सुरळीत होऊन पिकाचे रक्षण व्हावे यासाठी करंजा देवीची पूजा केली जाते, तसेच नैवेद्य दिला जातो, तसेच रांजणदेवीदेखील यासाठी महत्त्वाची मानली जात असून ती कोपरखैरणे गावात आहे.