नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे पाणी पुरवठा कर्मचारी रात्री झोपले आणि नेमके त्याच वेळेस मुख्य व्हॉल्व तुटला. परिणामी तीन टाकी कार्यालयालगत असलेल्या चाळीत लाखो लिटर पाणी शिरले. या ठिकाणी पुराप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली होती. काही रहिवाशीआणि पाणी पुरवठा कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना जागे केले. तेव्हा पाणी बंद केले, मात्र सकाळी ११ पर्यंत पाण्याचा निचरा झाला नव्हता.

कोपरखैरणेला पाणी पुरवठा करणाऱ्या तीन टाकी कार्यालयात २४ तास पाणीपुरवठा कर्मचारी आळीपाळीने (शिफ्ट वाईज) उपस्थित असतात. पाणीपुरवठा करताना कुठलीही समस्या आली तर कायम सतर्क राहणे अनिवार्य आहे. असे असले तरी अनेकदा रात्र पाळी कर्मचारी झोपतात. असाच प्रकार कोपरखैरणे येथे घडला. उपस्थित कर्मचाऱ्याला झोप लागली आणि पहाटे चारच्या सुमारास मुख्य वाहिनीतून या ठिकाणी पाणी आले. दुर्दैवाने त्या दबावाने व्हॉल्व तुटला. या फुटक्या व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली. या कार्यालया शेजारी असलेल्या चाळीत पाणी शिरले. जी घरे तळमजल्यावर आहेत त्या सर्व घरात पाणी शिरले. ज्या घरांचा स्तर इतर घरापेक्षा खाली आहे अशा घरात गुडघाभर पाणी झाले होते. 

हेही वाचा…प्रवाशांच्या मागणीनंतर सिडकोने नवी मुंबई मेट्रोची वेळ वाढवली

तीन-चार तास उलटून गेले पाणी गळती सुरू असल्याने ही परिस्थिती ओढवली या पाण्यामुळे लोक जागे झाले. नेमका काय प्रकार झाला, पाणी कुठून येते याचा शोध लागल्यावर पाणी पुरवठा कार्यालयात काही रहिवासी गेले आणि त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना उठवले. त्या नंतर कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर हालचाली करत पाणी गळती बंद केली, अशी माहिती स्थानिक रहिवाशी तुकाराम म्हात्रे यांनी दिली. तर व्हॉल्व तुटणे अपघात असू शकतो, मात्र कर्मचारी जागे न राहणे ही मानवी चूक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अन्य रहिवासी रवींद्र म्हात्रे यांनी दिली. 

हेही वाचा…नवी मुंबई : गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्मचाऱ्यांच्या चूक झाल्याने ही परिस्थिती ओढवली असून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच व्हॉल्व दुरुस्ती केली जाईल व अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल. अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.