नवी मुंबई : पामबीच मार्गावरील अतिवेगावर नियंत्रण येणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला असून सोमवारी रात्री झालेल्या अपघातात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर जवळजवळ प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तासभरापेक्षा अधिक वेळाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत मुलाच्या मृतदेहाजवळ पालकांचा आक्रोश पाहायला मिळाला. सातत्याने अपघात होणाऱ्या वेगवान पामबीच मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी कायमस्वरुपी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची मागणी वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पामबीच मार्गावर प्रतिताशी ६० किमी वेगाची मर्यादा असताना वाहने मात्र सुसाट वेगाने, वेगाचे नियंत्रण मोडून धावत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे पामबीचवरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने सातत्याने या मार्गावर अपघात होतात.

पामबीच मार्गावर रात्रीच्यावेळी अनेक दुचाकी व चारचाकी वाहक अतिवेगाने वाहने चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. बेलापूर किल्ले गावठाण चौकापासून ते वाशी अरेंजा कॉर्नरपर्यंत असलेल्या या मार्गावर अधिक अपघात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सेक्टर ५० कडे जाणारा सिग्नल, एनआरआय कॉलनीजवळील सिग्नल, अक्षर चौक, चाणक्य, करावे सिग्नल, नेरुळ सिग्नल, सारसोळे सिग्नल, मोराज सर्कल अरेंजा कॉर्नर असे टप्प्याटप्प्याने सिग्नल असतानाही मोठ्या प्रमाणात सिग्नल तोडून जाणारी वाहने पाहायला मिळतात. तर प्रति ६० किमीपेक्षा अधिक वेगाने वाहने जातात.

हेही वाचा : ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सूखोई विमानाची चाचणी

याच मार्गावर दिवसापेक्षा रात्रीच्यावेळी अपघात होण्याची संख्या जास्त असल्याची माहिती वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अपघात झाला तेव्हा पामबीच मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती. घटनास्थळी काही वेळानंतर पोहोचलेल्या वाहतूक पोलिसांनी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात तात्काळ रुग्णवाहिका पाठवण्याची सूचना केली तर दुसरीकडे उपस्थितांनी मृत मुलाच्या पालकांना बोलावले.करावे गावात राहणारे मुलाचे आई-वडील व आजोबा काही वेळातच घटनास्थळी पोहोचले.

जागीच मृत्यू झालेल्या आपल्या मुलाला व नातवाला पाहून सर्वांनीच रस्त्यावरच मृतदेहाजवळ हंबरडा फोडला. तर दुसरीकडे पामबीच मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचायला एक तासाहून अधिक काळ लागला. तोपर्यंत मृत मुलाच्या पालकांनी पामबीच मार्गावर हंबरडा फोडल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे पालिकेच्यावतीने पामबीच मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी कायमस्वरूपी एक रुग्णवाहिका ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा : चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्मारकांची दुरवस्था बांधकाम विभाग, पंचायत समितीचे दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पामबीच मार्गावर अतिवेगामुळे अनेक अपघात होतात. सोमवारी रात्री झालेल्या अपघातात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे घटनास्थळावरून तात्काळ नवी मुंबई महापालिका रुग्णालयातून रुग्णवाहिका पाठवण्याची विनंती केली. परंतु अपघातामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अपघात स्थळी पोहोचण्यास वेळ लागला होता. नवी मुंबई महापालिकेने पामाबीच मार्गावर कायमस्वरूपी एक रुग्णवाहिका ठेवावी याबाबत पालिकेकडे पत्रव्यवहार करणार आहे.

कृष्णा धामापूरकर, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, सीवूडस