नवी मुंबई: शुक्रवारी रात्री नेरुळ येथील विश्वशांती इमारतीतील एका सदनिकेच्या छताचा काही भाग कोसळला होता. त्याखाली बसलेल्या दोन जेष्ठ नागरिकांचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेने रहिवाशांना तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वीज पाणी मलनिःसारण वाहिनी सेवा बंद करण्यात येणार आहेत.
नेरूळ सेक्टर ८ मधील विश्वशांती सोसायटी मध्ये सदनिका क्रमांक ए ७ इमारत ७ या घरात शुक्रवारी रात्री प्राजक्ता पाटील यांच्या घरात छाताच्या स्लॅबचा मोठा भाग कोसळला. दोन वृद्धांचा जीव वाचला आहे. मात्र ७० वर्षीय महिला जखमी झाल्या. घरातील दिवाणखान्यातील छताचा भाग अचानक कोसळला. पंखा पूर्णपणे वाकलेला होता. सिडकोनिर्मित या इमारतीला ४० वर्ष झाली असून सद्या ही इमारत अति धोकादायक परिस्थितीत पोहोचली आहे. महानगर पालिकेने अतिधोकादायक इमारतीमध्ये या सोसायटीचा समावेश करूनही अद्याप येथे लोक राहत आहेत. या सोसायटीमध्ये सात इमारती असून २१० सदनिका धारक आहेत.
मनपाने अति धोकादायक म्हणून घोषित केल्यावर इमारतीतील १४९ सदनिका धारक अन्यत्र घर भाड्याने घेऊन राहत आहेत. मात्र ५३ कुटुंब अद्याप याच ठिकाणी राहतात. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यात इमारत अतिधोकादायक घोषित केली असून घडलेल्या घटनेनंतर मनपाचे सहाय्यक आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
पुनर्विकास रखडलेला
ही इमारत अतिधोकादायक घोषित झाल्यावर पुनर्निर्माण प्रक्रिया सुरु करण्यात आली. सर्वानुमते एका विकासकाकडे कामही देण्यात आले. दरम्यान सोसायटी अंतर्गत निवडणुका झाल्या आणि त्यानंतर पुनर्विकास बाबत अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. या शिवाय पर्यावरण परवानगी अद्याप बाकी आहे. या दोन्ही कारणांनी विलंब होत आहे, अशी माहिती रहिवाशांनी दिली.
रहिवाशांना घर सोडण्याची अंतिम नोटीस बजावली आहे. काही दिवसांची मुदत मागितली आहे. त्यानंतर तात्काळ सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत. – सोमनाथ पोटरे, उपायुक्त, परिमंडळ एक