पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात मागील महिन्याभरात ३,७९४ जणांना ताप, डोकेदुखी, सर्दी व खोकला या आजाराचे रुग्णांची नोंद झालीआहे. हा आजार थोडासा संसर्गजन्य असल्याने मुखपट्टी लावा, घरात स्वच्छता आणि गर्दीत जाणे टाळा अशा सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांसाठी दिल्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने रविवारीसुद्धा नागरी आरोग्य केंद्र सुरू ठेवले आहेत.
मागील वर्षी २३ मे ते २३ जून या दरम्यान पनवेल महापालिका क्षेत्रात ३,६४९ रुग्ण या आजाराचे आढळले होते. यंदा जून महिन्यातच मागील वर्षीपेक्षा १४५ रुग्ण वाढल्याने महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीमध्ये पावसाळ्यात कॉलरा, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या जलजन्य व किटकजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता व वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी उकळलेले पाणी प्यावे, स्वच्छ अन्न सेवन करावे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी साचलेले पाणी हटवावे व पाण्याची टाकी निर्जंतुक करावी. फुलदाणी, वॉटरकूलर यातील पाणी आठवड्यातून एकदा काढून कोरडे ठेवावे, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले. ताप, सर्दी, खोकला किंवा इतर लक्षणे आढळल्यास तातडीने नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. तसेच साथीचे रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या idsppanvelcorporation@gmail.com या ई-मेलवर माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेचे साथरोग तज्ज्ञ डॉ. आकाश ठसाळे यांनी केले आहे.
मागील वर्षी मे आणि जून या महिन्यात तापाचे रुग्ण – ३०७८
यावर्षी मे आणि २३ जूनपर्यंत तापाचे रुग्ण – २९८२
मागील वर्षी मे व जून महिन्यात सर्दीचे रुग्ण – १७५५
यावर्षी मे व २३ जूनपर्यंत सर्दीचे रुग्ण – १६२९
