नवी मुंबई: उन्हाळ्यात महाग असणाऱ्या फळभाज्या पावसाळा सुरू होताच स्वस्त होण्यास सुरुवात होत असते परंतु पावसाळ्यात पालेभाज्यांचे भाव वधारतात. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात पावसामुळे कोथिंबीरची आवक कमी झाली असून दर वधारले आहेत. घाऊक बाजारात १०-१४ रुपयांवर असलेली कोथिंबीर जुडी आता २०-२५ रुपयांवर पोहचली आहे. तर किरकोळ बाजारात ३०-४०रुपयांनी विक्री होत आहे.

एपीएमसी बाजारात पुणे आणि नाशिक येथून कोथिंबीर दाखल होत आहे. गुरुवारी बाजारात २ लाख १६ हजार ६०० क्विंटल कोथिंबीर दाखल झाली होती परंतु शुक्रवारी १ लाख ९४ हजार क्विंटल आवक झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसाने कोथिंबीरच्या उत्पादनात घट होत असून परिणामी आवक कमी होत आहे.

हेही वाचा… कांदा व्यापाऱ्यांना हजार फुटांचे गाळे? मोफत गाळ्यांसाठी निधी उभारणीची धडपड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाच्या संततधारेने पिकाला पाणी लागल्याने कोथिंबीर खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच काढलेली कोथिंबीर पाण्यात भिजल्याने लवकर कुजत आहे. त्यामुळे बाजारात दाखल होणाऱ्या कोथिंबीरीत घट झाली आहे. ३०% कोथिंबीर खराब येत आहे, त्यामुळे दरवाढ झाल्याचे मत व्यापारी भाऊसाहेब भोर यांनी व्यक्त केले आहे. गृहिणी प्रत्येक पदार्थत प्रामुख्याने कोथिंबीरीला अधिक पसंती देत असतात. घाऊक बाजारात आधी १० ते १४ रुपयांना मिळणारी कोथिंबीर जुडी आता २०-२५ रुपयांवर तर किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपयांवर वधारली आहे.