उरण : जूनपासून राज्यातील खोल समुद्रातील मासेमारी बंद आहे. या कालावधीत मच्छीमार आपल्या जाळ्यांच्या दुरुस्तीच्या कामाला लागले आहेत. मासेमारीसाठी वापरण्यात येणारी महाकाय जाळी दुरुस्तीसाठी आंध्रप्रदेश आणि कोकणातील करागिरांचा हात महत्त्वाचा आहे. ही जाळी शिवण्यासाठी जवळपास ४०० पेक्षा अधिक कारागीर चार ते पाच महिन्यासाठी करंजा बंदरात मुक्काम करतात. हे कारागीर तासाला १०० रुपये या दराने काम करतात.
खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीवर २०० फुटांपेक्षा लांब व पन्नास ते साठ फूट रुंद अशा जाळी वापरण्यात येतात. मासळी पकडत असताना सुरमई आणि बगा तसेच इतर माशांमुळे जाळी तुटते, नादुरुस्त होते. ही जाळी दोन महिन्यांच्या बंदी काळात दुरुस्ती करण्याची कामे करण्यात येतात. महाकाय अशी जाळी बोटींवरून चढ उतार करण्यासाठी मोठ्या वाहनांची मदत घेतली जाते. या जाळ्यांची दुरुस्ती करणे हे जिकरीचे काम आहे.
मशीनच्या सहाय्याने तयार करण्यात आलेली ही जाळी शिवण्याचे कौशल्य हे आंध्रप्रदेश मधील मच्छीमारांना आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हे काम त्यांच्याकडून केले जात आहे. जून ते जुलै या दोन महिन्यांच्या कालावधी साठी मासेमारी बंदी असल्याने प्रामुख्याने हे काम या दोन महिन्यांपासून सुरू होते. मात्र आंध्रप्रदेश मधील कारागीर हे मे महिन्यापासूनच करंजा बंदरात दाखल होतात. ते गणेशोत्सवापर्यंत काम पूर्ण करून आपल्या राज्यात परततात अशी माहिती करंजा येथील मच्छिमार नेते रमेश नाखवा यांनी दिली.