रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या अद्ययावत उपकरणांची कमतरता आणि डॉक्टर व परिचारिकांची रिक्त पदे यामुळे ऐरोली आणि नेरुळमधील महापालिका रुग्णालये अशक्त झाली आहेत. तेथील रुग्णांचा भार अन्य रुग्णालयांवर येत आहे. परिणामी आरोग्य सेवेच्या स्तरावर नवी मुंबई महापालिका मुंबई आणि ठाणे महापालिकेपेक्षा मागे पडली आहे. अत्यंत कमी वेतन मिळत असल्यामुळे अवघ्या एक-दोन वर्षांचा अनुभव डॉक्टरही पालिकेच्या रुग्णालयांना रामराम ठोकत आहेत. त्यामुळे डॉक्टरांची पदे रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

नवी मुंबई पालिकेत २१ नागरी आरोग्य केंद्रे, तीन माताबाल संगोपन केंद्रे, दोन १०० खाटांची सार्वजनिक रुग्णालये आणि वाशी येथे एक मध्यवर्ती सार्वजनिक रुग्णालय आहे. याच रुग्णालयातील दोन लाख चौरस फुटांचा भाग सुपर स्पेशालिटी सेवेसाठी हिरानंदानी फोर्टिज रुग्णालयाला २५ वर्षांच्या भाडेपट्टय़ावर देण्यात आला आहे. त्या बदल्यात पालिकेने शिफारस केलेल्या १५ टक्के गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जात. जेमतेम १२ ते १४ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात आरोग्य सेवा मुंबईपेक्षा दर्जेदार असणे आवश्यक होते, मात्र अंतर्गत राजकारण आणि डॉक्टरांचा तुटवडा यामुळे ही सेवा पिछाडीवर पडली आहे.

नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने सुमारे २०० कोटी रुपये खर्च करून ऐरोली व नेरुळ येथे छोटी सार्वजनिक रुग्णालये उभारली आहेत, मात्र या रुग्णालयात केवळ बाह्य़रुग्ण सेवा सध्या दिली जाते. रुग्णांसाठी लागणारी ऑक्सिजन गॅस वाहिनी डीन पद्धतीने बसवावी की एचटीएम पद्धतीची बसवावी यावर गेली दोन वर्षे वाद सुरू आहेत. या रुग्णालयांतील सेवा डॉक्टर आणि  फर्निचरमुळे रखडली आहेत.

ऐरोली आणि नेरुळचे रुग्णालय बंद असल्याने वाशी येथील मध्यवर्ती रुग्णालयावरील ताण कमालीचा आहे. ३०० खाटांच्या या रुग्णालयात सध्या ४५० रुग्ण आहेत. ओपीडीमध्ये दीड ते दोन हजार रुग्णांवर उपचार घेतात. त्यामुळे गंभीर रुग्णांना काही वेळा शीव येथील मुंबई पालिकेच्या रुग्णालयात पाठविण्याची वेळ डॉक्टरांवर येते. मुंबईतील डॉक्टर नवी मुंबई पालिकेच्या सेवेत येण्यास तयार होत नाहीत. येथील तुटपुंजा पगार आणि अपुऱ्या सेवा सुविधांमुळे निष्णात डॉक्टर नवी मुंबई पालिकेपासून दूरच राहणे पसंत करतात.  उत्तर आणि दक्षिण नवी मुंबईतील सार्वजनिक रुग्णालये बांधून तयार असताना ती सुरू नसल्याने या भागातील रुग्णांचा ताण वाशी रुग्णालयावर येतो.

रुग्णालयीन साहित्य आणि डॉक्टरांची कमतरता यामुळे येथील आरोग्य सेवेवरील ताण वाढला आहे, मात्र या महिन्यात दोन रुग्णालये सुरू करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची निविदा खुली होणार आहे. नवीन रुग्णालयांसाठी ५४ डॉक्टर आणि १५० इतर कर्मचारी लागणार आहेत. नोकरभरती आणि साहित्य पुरवठय़ाचे सोपस्कार पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी ही दोन्ही रुग्णालये सुरू करणाचा पालिकेचा प्रयत्न आहे.

– डॉ. रमेश निकम, वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई पालिका