आंतरराष्ट्रीय योगदिनी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विशेष कार्यक्रमात योग साधकांनी विविध आसने सादर करून उपस्थितांना थक्क केले. मल्लखांबाची प्रात्यक्षिकेही या वेळी दाखवण्यात आली.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नवी मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रथम केंद्र सरकारच्या आयुष विभागाने बनवलेला योगासनाच्या ‘कॉमन योग प्रोटोकॉल’चे सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर समर्थ व्यायाम शाळेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या योगपटूंनी मल्लखांबावरील योगासने केली. उपस्थितांनी टाळ्या वाजवून योगपटूंना प्रोत्साहन दिले. त्यानंतर प्रत्यक्ष योगाभ्यासास सुरुवात झाली. हजारो नागरिकांनी या वेळी योगाचे प्रकार शिकून घेतले. प्रत्येक आसनानंतर ते यशस्वीरीत्या केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. उपस्थितांना सातत्याने योग करीत राहण्याची शपथ देण्यात आली. पाच हजारांहून अधिक नवी मुंबईकर कार्यक्रमात सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे.