scorecardresearch

गेले अनेक वर्ष गणेश नाईक नवी मुंबईचे वाटोळे करण्याचे काम करत आहेत : जितेंद्र आव्हाड

पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन करण्यात आले.

Jitendra Awhad NCP Navi Mumbai
जितेंद्र आव्हाड

पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन करण्यात आले. ३५० कोटी रुपये खर्च करून ३९० झाडांची कत्तल करत कोपरी उड्डाणपुलाच्या निर्मितीचा घाट घातला जातोय, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसेच या वृक्षतोडीला राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचंही नमूद केलंय. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी याच वृक्षतोडीवरून आंदोलन करणाऱ्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर हल्ला चढवला आहे.

जितेंद्र आव्हाड मागील अनेक दिवसांपासून उड्डाणपुलासाठी होणाऱ्या मोठ्या वृक्षतोडीला विरोध करत आहेत. दुसरीकडेआता भाजपा आमदार गणेश नाईक यांनी देखील आज लाँग मार्च काढत आंदोलन केलं. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी नाईकांवर जोरदार टीका केली. २००८ साली या उड्डाणपुलाचा ठराव गणेश नाईक यांनीच केला होता. त्यामुळे गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “उड्डाणपुलासाठी वृक्षतोडीला गणेश नाईक यांनी मान्यता का दिली? अजेंडा कोण बनवतं हे अख्ख्या नव्या मुंबईला माहिती आहे. हे सर्व गणेश नाईक ठरवतात. कोणी काय बोलायचं हे देखील गणेश नाईक ठरवतात.”

“गणेश नाईक नवी मुंबईचे रक्त पिले आहेत”

“दुर्दैवाने शरद पवार यांनी खूप विश्वासाने गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबई सोपवली होती. मात्र, या नवी मुंबईतील ठराव बघितल्यानंतर आम्हाला कळतंय की जसे रक्तपिपासू असतात, तसे गणेश नाईक नवी मुंबईचे रक्त पिले आहेत,” असा आरोप आव्हाड यांनी केला.

“गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे”

“या वृक्षतोडीसाठी गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे. या वृक्षतोडीसाठी आधी गणेश नाईक जबाबदार आहेत आणि मग आयुक्त बांगर जबाबदार आहेत,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

“गेले अनेक वर्ष गणेश नाईक नवी मुंबईचे वाटोळे करण्याचे काम करत आहेत”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “नवी मुंबईचे वाटोळे करण्याचे काम एकच माणूस गेले अनेक वर्ष करत आहे. त्या माणसाचे नाव गणेश नाईक आहे. तो माणुस स्वार्थाचा आहे. जो माणुस बाळासाहेब ठाकरे यांचा झाला नाही, ज्यांनी त्यांना घडवले, जो माणूस शरद पवारांचा झाला नाही ज्यांनी त्यांना सत्तेचा अख्खा वाटा दिला, तो तुमच्या नवी मुंबईकरांचा काय होणार? त्यांनी नवी मुंबईच्या जनतेची माफी मागायला पाहिजे.”

हेही वाचा : “शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो”, राज ठाकरेंच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “तुमच्या डोक्यात…”

काही वेळातच आंदोलन संपल्याने आव्हाडांवर टीका

जितेंद्र आव्हाडांनी केवळ ५ मिनिटात आंदोलन आटोपत घेतल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीकाही होत आहे. तसेच कार्यकर्त्यांचीही यामुळे निराशा झाल्याचं बोललं जातंय. “केवळ मीडिया बाईटसाठी जितेंद्र आव्हाड रस्त्यावर उतरले होते. भाजपाच्या आंदोलनामुळे आव्हाडांची निराशा झाली आणि त्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला,” असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2022 at 17:39 IST
ताज्या बातम्या