उरण : जेएनपीटी व्यवस्थापनाने १७० कोटी खर्चून नव्याने उभारण्यात आलेल्या कोस्टल बर्थ जेट्टीचेही पीपीपी तत्वावर खासगीकरण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या महिनाभरात कोस्टल बर्थ जेट्टी पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.  

जेएनपीटी बंदरातून देशातील एकूण सरकारी ११ प्रमुख बंदरांपैकी ५३ टक्के मालाची वाहतूक केली जाते. जेएनपीटी बंदरातून दररोज ४० टक्के कंटेनर मालाची वाहतूक केली जाते. याच बंदरातून कंटेनर ट्रेलर मुंबई भिवंडी, नवी मुंबई, पनवेल येथील मोठ मोठय़ा गोदामात ने-आण केली जाते. या गोदामातून कंटेनर मालाचे देशभरात वितरण केले जाते. बंदरातुन दररोज आयात-निर्यात होणाऱ्या मालाची रस्ते मार्गाने वाहतूक केली जाते.

 दररोज सुमारे वीस हजार कंटेनर मालाच्या वाहतुकीमुळे जेएनपीटीपासून ठाणे, मुंबई पर्यंत मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. सातत्याने होणाऱ्या या वाहतूक कोंडीच्या समस्येंमुळे माल वेळेत पोहचण्यात विलंब होतो. विलंबामुळे व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागते. वेळही वाया जातो. किनारपट्टीवरील मालवाहतुकीला चालना देण्यासाठी आणि वाहतुकीची समस्या कायमची कमी करण्यासाठी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सागरमाला कार्यक्रमांतर्गत जेएनपीटीने  कोस्टल जेट्टी उभारली आहे.

कोस्टल बर्थमुळे सागरी किनारपट्टीवरील मालवाहतूक ग्रीन चॅनलमधुन निर्धोक होणार आहे. देशांतर्गत मालवाहतुकीमध्ये किनारपट्टीवरील मालवाहतुकीचा हिस्सा वाढणार आहे.

पर्यायाने आयात निर्यात व्यापारी वर्गाला त्याचा अधिक फायदा व मदत होणार आहे. बंदराच्या भागधारकांनाही आर्थिक कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार नियोजन पद्धतीने गुंतवणूक करीत आहेत.

या जेट्टीचे बांधकाम नोव्हेंबर २०२० मध्येच पूर्ण झाले आहे. ड्रेझिंगचे कामही अंतिम टप्प्यात आहे.कोस्टल बर्थ जेट्टी

पीपीपी तत्वावर चालविण्यासाठी केंद्र सरकारकडून येत्या आठवडाभरात मंजुरीही मिळेल. त्यानंतर येत्या काही दिवसात कोस्टल बर्थ जेट्टीच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.

रस्ते रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होणार

* १७०.२० कोटी खर्चाच्या या कोस्टल बर्थवरून २.५ दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्याची योजना आहे. यामध्ये ब्रेक बल्क, ड्राय बल्क, सिमेंट, ईडिबल ऑईल आदी मालाची रस्तेमर्गा ऐवजी थेट समुद्रमार्गे देशभरात वितरण करण्यात येणार आहे.

* सिमेंट स्टोरेजसाठी जेएनपीटी ११ हेक्टर बॅंकअप क्षेत्रासह कार्गो स्टोरेज यार्ड, गोदामे उभारणार आहे. तसेच किनारपट्टीवरील मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्याप्रकारे पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* कोस्टल बर्थमुळे रस्ते आणि रेल्वेवरील माल वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. जहाजाच्या फेऱ्या जलदगतीने होण्यासाठीही मोठी मदत होणार आहे.तसेच वाहतुकीसाठी कमी होणाऱ्या स्पर्धात्मक दराचा फायदाही व्यापाऱ्यांना होणार असल्याची माहिती जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.