करावे

गावाच्या चारही बाजूंनी शुभ्र-धवल मिठाची आगारे, आगारांची विभागणी करणारे बांध, मध्येच एखादे वडाचे झाड, भर उन्हाळ्यात मिठागारांवर काम करणारे पुरुष, महिला. घरटी उद्योग रोजगार, धुरळा उडवत जाणाऱ्या खिल्लारी बैलाच्या गाडय़ा, कलगी तुरा, तमाशा, नाटक या कला जपणारी मंडळी, राज्यात माघी गणेशोत्सव सुरू करण्याचा पहिला मान, पंचक्रोशीत राजकीय दबदबा निर्माण करणारे नेतृत्व, सुशिक्षितांचे माहेरघर, एमआयडीसी सिडकोत सर्वाधिक नोकरी करणारे तरुण, उन्हाळ्यात मिठागरे, पावसाळ्यात शेती आणि हिवाळ्यात मासेमारी असे स्वावलंबी जीवन जगणारे पामबीच मार्गावरील चाणक्यजवळचे गाव म्हणजे करावे गाव.

homes, mill workers, mmrda
संथ कारभाराचा गिरणी कामगारांना फटका, रांजनोळीतील १२४४ घरांची दुरुस्ती रखडलेली; २५२१ घरांची सोडतही लांबणीवर
CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन

कारवा नावाच्या बेटावरून पडलेले करावे हे नाव. करावे नावाप्रमाणेच या गावातील प्रत्येक ग्रामस्थ आयुष्यात काही तरी करीत राहिलेला आहे. तळोजा येथील रोहिंजन गावातून पेंढय़ांचे भारे विकण्यास येणाऱ्या ग्रामस्थांनी दोनशे अडीचशे वर्षांपूर्वी हे गाव वसविल्याची नोंद आहे. तांडेल, म्हात्रे, नाईक, भोईर, पाटील, मढवी आणि सांगडे या सात कुटुंबांतून गावाचा विस्तार झाला आहे. त्या वेळची सातशे लोकसंख्या आता सात हजार झाली आहे. पंचवीस एकरवर असलेले हे गाव आता फुगले असून ५६ एकरांवर पसरले आहे. पहिल्यापासून स्वावंलबन जपणाऱ्या या गावाची आजची श्रीमंती बेलापूर पट्टीत चर्चेचा विषय आहे.

‘कष्ट हेच भांडवल’ या ब्रीदवाक्यावर प्रत्येक ग्रामस्थ विश्वास ठेवणारा आहे. त्यामुळे सहा मिठागरांनी वेढल्या गेलेल्या या गावातील प्रत्येक घरातील स्त्री-पुरुष हे मिठागरावर कामाला जात होते. महिला टोपलीने मीठ वाहण्याचे काम करीत तर पुरुष मिठासाठी लागणारी तळी तयार करण्याच्या कामात पटाईत. सहा बाय दहाचे छोटे छोटे हौद करून त्यात भरतीने येणारे समुद्राचे पाणी साठवले जात होते. खारट पाण्याची तळी तयार करण्याचे काम पुरुष मंडळी करीत होती. त्यांना खारवे म्हटले जात होते. आठ दिवसांनी त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन मीठ तयार व्हायचे. ते वाहून नेण्याचे काम महिला करीत होत्या. दोन प्रकारचे मीठ तयार होत असे. त्यात काळसर मीठ खाण्यासाठी वापरले जात असे तर पांढरेशुभ्र मीठ रासायानिक कंपन्या विकत घेत होत्या. पनवेल, ठाणे व मुंबई या जवळच्या बाजारपेठा मात्र शुभ्रधवल मिठाला रासायानिक कारखान्यात मोठी मागणी. देश-परदेशातून येणारी मोठमोठी जहाजे म्हणजेच फत्तेमार एलिफंटाजवळ लागायची. त्या ठिकाणी मीठ नेण्यासाठी नंतर करावे ग्रामस्थांनीच मचवे (होडय़ा) घेतले. ती संख्या टप्प्याटप्प्याने शंभर एक झाली. या मचव्यातून १००-१०० किलोच्या ३५० गोणी एलिफंटापर्यंत नेल्या जात होत्या. रासायनिक कारखान्यांसाठी तयार होणाऱ्या पांढऱ्याशुभ्र मिठावर पडणारे सूर्य किरणांचा प्रकाश परावर्तित होऊन डोळ्यांना इजा होऊ नये यासाठी खारवे गॉगल वापरत होते. इतके ते मीठ शुभ्र होते. कराव्याच्या पूर्व बाजूस म्हणजेच आजच्या एनआरआयपर्यंत ८०० एकरांवर कृष्णा आगार आणि ललिता आगार अशी दोन मिठाची मोठी आगारे होती तर पश्चिम बाजूस वडाची, कोलजी, माणी आणि तळ्याचे आगार अशा सहा आगारांच्या मधोमध उभे राहिलेले हे करावे गाव. सॉल्ट डिपार्टमेंटने ९९ वर्षांच्या लीजने दिलेल्या या आगारांवर तशी हुकमत पारशी व मुस्लीम समाजातील भांडवलदारांची होती. यात नंतर फाळणीच्या वेळी हाजी सत्तार यांचे मिठागर ठाण्याच्या भावे कुटुंबाने घेतले. सिडकोकडून त्यांनाच नुकसानभरपाईपोटी भूखंड मिळाले. कराव्याच्या दोन तांडेलांनी ही आगारे स्वमेहनतीवर सांभाळली होती. गावाची त्या वेळची लोकसंख्या ७००च्या घरात. मिठागरांवर काम करणारी शंभर टक्के मंडळी या गावात राहत होती. आगारावर काम करणारे म्हणून आगरी अशी नंतर या समाजाची जात प्रचिलित झाली ती कायमची चिकटली.

सहा आगारांवर काम करणाऱ्या कामगारांची नोंद ठेवण्याची पद्धतही मोठी मजेशीर होती. नारळाच्या सुकलेल्या झावलांवर कामगार करीत असलेल्या कामाची लिखापढी होत होती. क्रिकेटचा स्कोर लिहितात त्याप्रमाणे महिला टाकत असलेल्या पाटय़ा या झावलांवर लिहिल्या जात होत्या. वीस पाटय़ा म्हणजे एक सल असा काहीसा हिशेब असलेल्या या कामाच्या बदल्यात पंधरावडय़ात ४० ते ४५ रुपये प्रत्येक महिलेच्या पदरात पडत होते तर पुरुषांनाही तळी निर्माण करण्याचा यापेक्षा दुप्पट मोबदला मिळत असल्याने मुला-बाळांचे शिक्षण करणे सोपे गेले. त्याचमुळे या गावात पदवीधर झालेले तरुण जास्त आहेत. सिडकोत ४६ तरुण त्या वेळी कामाला लागले तर एमआयडीसीत यापेक्षा तिप्पट तरुणांनी नोकरी पत्करली. त्यामुळे काळाच्या ओघात मिठागरे गायब झाल्याची झळ गावाला बसली नाही.

गावासाठी विहीर खोदताना हनुमानची मूर्ती सापडली. त्यामुळे गावातील पहिले मंदिर म्हणजे जय बजरंगबलीचे मंदिर. त्यानंतर आता बरीच मंदिरे झाली. एलिफंटाला मीठ नेण्यासाठी घेतलेल्या मचव्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना शाळेत-कॉलेजमध्ये सोडण्यासाठीही झाला. मचव्यातून शाळेत जायाला मिळतयं म्हणून मुलेही शाळेत जाऊ लागली. त्यामुळे मुले शिकली आणि गावाची प्रगती झाली. गावात होळी, पालखी, जत्रा हे सण महत्त्वाचे. विशेष म्हणजे बेलापूर पट्टीत चैत्र महिन्यातील जत्रांची सुरुवात याच गावातून होते. चैत्र शुक्ल सप्तमीला ही जत्रा गावाची आजही एक वेगळी ओळख करून देणारी आहे. जत्रेत गावातील कलाकरांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपिठे तयार केली गेली. त्यामुळे तमाशापासून ते नाटय़संगीतापर्यंत सर्व कलांचा उदय या गावात झाला आहे. कोकणातील बाल्या नृत्य या गावाने काल-परवापर्यंत जपले होते. गावाच्या या कलाप्रेमापोटी मास्टर नरेश यांनी संगीत शारदा, महानंदा, मानपान, यासाठी दिग्दर्शन केले असल्याच्या आठवणी ग्रामस्थ मोठय़ा अभिमानाने सांगतात. राज्यात माघी गणेशोत्सव साजरा करण्याचा मानही या गावाच्या नावावर आहे. गावाच्या एकोप्याचा आणि सतर्कतेचा एक किस्सा फार अभिमानास्पद आहे. समुद्रकिनारी असलेल्या या गावाच्या जवळून जाणाऱ्या खाडीपात्रातून त्या वेळी सोने, चांदी व इलेक्ट्रॉनिक्स सामानांची तस्करी चालायची. अशीच या मार्गावरून जाणारी एक बोट एकदा या ठिकाणी बंद पडली. अशी बोट बंद पडली किंवा थांबली तरी त्यातील माल लुटण्याची त्या वेळी एक सवयच होती. सोन्या-चांदीने भरलेली ही कपडय़ांची बोट लुटण्यास ग्रामस्थ गेल्यावर कस्टममध्येच कामाला असलेल्या गावातील एक तरुणाने बोट न लुटता सरकारजमा करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनी ते ऐकले. आणि ती बोट पोलीस व कस्टमच्या ताब्यात देण्यात आली. त्याबदल्यात गावाला चाळीस हजारांचे इनाम मिळाले. त्याचा अभिमान गावाला आजही आहे. पाकिस्तान आणि भारताच्या युद्धात पाकिस्तानची नजर मुंबईवर होती. युद्धाच्या काळात सर्वत्र ब्लॅकआऊट केले जात होते. त्याच वेळी बेलापूर येथील एका धार्मिक स्थळावर रात्रभर जळणारा दिवा विझवण्यासाठी अख्खे गाव तेथे गेले होते. आता गाव आणि शहर एक झाले असून लोकसंख्या ३२ हजारांच्या घरात गेली आहे. गावात कितीही हेवेदावे, मतभेद, मनभेद असले तरी ते चर्चेने सोडविण्यावर भर आहे. दोन पक्षांचे विरोधक गळ्यात गळा घालून गप्पा मारताना दिसले तर नवल नाही. शिक्षणामुळे हा समंजसपणा आला आहे. एकोपा हा या गावाचा खजिना आहे. तो सांभाळण्याचे काम तरुण पिढी आजही करीत आहे.