पनवेल : हेटवणे धरणातून येणा-या जलवाहिनीला खारपाडा पुलाजवळ आपत्कालीन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने द्रोणागिरी, उलवे, खारघर आणि तळोजा या सिडकोच्या वसाहतींमध्ये बुधवार (ता.९) आणि गुरुवारी (ता.१०) या ४८ तासात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती सिडकोने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.जलवाहिनीमधील गळती दुरुस्त करण्यासाठी तातडीची कामे सुरू करण्यात आली आहेत. या कालावधीत नागरिकांना पाण्याचा पुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा व अत्यावश्यक गरजेसाठीच पाण्याचा वापर करावा, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे.

११ जुलै म्हणजे शुक्रवारपासून पाणीपुरवठा नियमित सुरू करण्यात येणार असला, तरी सुरुवातीला तो कमी दाबाने आणि मर्यादित प्रमाणात होईल, असेही सिडकोने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी शनिवार उजाडण्याची शक्यता आहे. नागरिकांना होणाऱ्या या गैरसोयीबद्दल सिडकोने खेद व्यक्त केला असून, पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.