विकास महाडिक, नवी मुंबई

जगाच्या नकाशावर सिंगापूरला एक अन्यन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या इकॉनिमिक्स डेव्हलपमेंट बोर्ड (ईडीबी) या सिंगापूर सरकारच्या शासकीय कंपनीला खारघर येथील सिडकोच्या कॉर्पोरेट पार्कच्या (केसीपी) डिझाइन व सल्लागाराचे काम देण्याचा सिडको प्रशासनाने निर्णय घेतला आहे. जगातील अमेरिका, इंग्लड आणि नेदरलॅण्डमधील २३ वास्तुविशारदांना मागे टाकून ‘ईडीबी’ने या कामात बाजी मारली आहे.

येत्या महिन्यात या कंपनीबरोबर करार होऊन मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर एक आधुनिक कॉर्पोरेट पार्क उभारले जाणार आहे. या वसाहतीतील भूखंड सिडको लवकरच लिलाव पद्धतीने विकणार आहे. विमानतळ, मेट्रो, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्कसारखे मोठे प्रकल्प मार्गी लावल्यानंतर सिडकोने खारघरमध्ये पारसिक डोंगर रांग आणि सेंट्रल पार्कमध्ये असलेल्या १२० हेक्टर मोकळ्या जागेवर बीकेसीच्या धर्तीवर एक अद्ययावत कॉपरेरेट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. निर्सगाच्या सान्निध्यात बांधण्यात येणाऱ्या या कॉर्पोरेट पार्कचे डिझाइन तयार करण्यासाठी जागतिक निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात अमेरिका, इंग्लड, नेदरलॅण्ड, चीन आणि सिंगापूरमधील २४ वास्तुविशारदकांनी स्वारस्य दाखविले होते. या वास्तुविशारदांच्या डिझाइन गेल्या वर्षी सिडकोला मिळाल्या होत्या. यातील एक डिझाइनवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सिडकोने पाच तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने सिंगापूरच्या ईडीबीच्या डिझाइनला मान्यता दिली आहे.  ईडीबी या सिंगापूर शासकीय कंपनीने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्याची मुख्यालयाची लक्षवेधी व आर्कषक डिझाइन तयार केली आहेत. या कंपनीबरोबर सामंजस्य करार झाल्यानंतर खारघर कॉपरेरेट पार्कचे एक आगळेवेगळे डिझाइन तयार केले जाणार आहे.

भूखंडांचा लिलाव होणार

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या कामाला चालना दिली असून डिझाइन तयार झाल्याबरोबर या वसाहतीतील भूखंडांचा लिलाव केला जाणार आहे. नवी मुंबई विमानतळामुळे या भूखंडांना बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून चांगली मागणी येण्याची शक्यात वर्तवली जात आहे.

जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार

या कॉपरेरेट पार्कमध्ये वांद्रे येथे वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बीकेसीमधील त्रुटी वगळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परदेशी कंपन्यांत असणाऱ्या सर्व सुविधा या कॉर्पोरेट पार्कमध्ये उपलब्ध होणार आहेत.

खारघरमधील कॉर्पोरेट पार्कचे डिझाइन आणि सल्लागारचे काम सिंगापूरच्या ईडीबीला देण्याचा निर्णय झाला आहे. या कंपनीबरोबर सांमजस्य करार झाल्यानंतर या कॉपरेरेट पार्कचे आगळेवेगळे डिझाइन तयार केले जाणार आहे. या भागाला चांगली निर्सगसंपदा मिळाली आहे. त्याचा उपयोग केला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-एस. के. चौटालिया, अतिरिक्त मुख्य अभियंता, सिडको.