पनवेल : पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या खारघरवासीयांचा आवाज भाजपच्या माजी नगरसेवकांनी सिडको भवनात दणक्यात पोहचवला. त्यांनी बुधवारी दुपारी अचानक बेलापूर येथील सिडको भवनात अभ्यांगताप्रमाणे शिरून मुख्य अभियंत्यांच्या दालनात केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे अखेर सिडकोला नमते घ्यावे लागले. पाच तासांच्या आक्रमक आंदोलनानंतर सिडकोच्या मुख्य अभियंत्यांनी ‘पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत नवीन नळजोडणी देणार नाही’, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांच्या हाती दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

खारघरमधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने ‘लोकसत्ता’ ने या गंभीर विषयाला सातत्याने वाचा फोडली होती. जोपर्यंत सिडको पाणी पुरवठा सुरळीत करत नाही तोपर्यंत सिडकोने नवीन बांधकाम परवानगी देऊ नये अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. बुधवारी भाजपचे माजी नगरसेवक सिडको भवनात थेट तिसऱ्या मजल्यावरील पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता शिला करुणाकरन यांच्या कार्यालयात भाजपचे पदाधिकारी शिरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आंदोलनात माजी नगरसेवकांनी घोषणाबाजी करत सिडको भवन अक्षरशः हादरवून सोडले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच मुख्य अभियंत्यांनी बांधकाम परवानगी एेवजी नवीन जल (नळ) जोडणी देण्यात येणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले. या आंदोलनात अॅड. नरेश ठाकूर, प्रविण पाटील, निलेश बाविस्कर, गुरुनाथ गायकर, हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, आरती नवघरे, अनिता पाटील या माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.