नवी मुंबई : घराबाहेर जाताना अनेकदा दरवाजा बाहेरील चप्पल स्टॅन्ड मध्ये घराची किल्ली ठेवण्याची सवय अनेकांना असते. मात्र हीच सवय कोपरखैरणेत राहणाऱ्या एका व्यक्तीला महागात पडली आहे. दोन चोरांनी हि किल्ली घेऊन घर उघडले आणि घरातील २५ लाखांचा ऐवज चोरी केला आहे. धक्कादायब बाब म्हणजे सीसीटीव्ही पाहणी केली असता चोरटे फिर्यादी यांच्या भावाचे मित्र असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी दोन व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठ्या शहरात राहणारे घरातील बहूतांश लोक नोकरी किंवा व्यवसाय निमित्त बाहेर पडतात. तर मुले शाळेत जातात. अशा वेळी प्रत्येकाकडे कुलुपाची एक चावी अनेक जण बनवून ठेवतात तर अनेक जण शेजारी राहणाऱ्या व्यक्ती कडे किल्ली ठेवतात. मात्र शेजारी हि घरी नसतील वा सहकार्य करीत नसतील तर घराबाहेरील चप्पल स्टॅन्ड मध्ये किल्ली लपवून ठेवतात. मात्र हि बाब अन्य व्यक्तींना चोरीच्या भीतीने सांगितली जात नाही.

हीच भीती कोपरखैरणेत राहणाऱ्या शिवानी कारकूल यांच्या बाबतीत खरी ठरली आहे.कारकूल हे कोपरखैरणे सेक्टर १९ येथे राहतात. घराबाहेर पडताना दरवाजाची किल्ली दरवाजा बाहेरील चप्पल स्टॅन्ड मध्ये ठेवण्याची त्यांना सवय आहे. अशाच पद्धतीने त्यांनी २४ ते २७ जून दरम्यान ठेवली होती. परत आल्यावर त्यांनी नेहमी प्रमाणे किल्ली काढून कुलूप उघडत घरात प्रवेश केला. आणि नित्यनियमाप्रमाणे काम सुरु केले . काही दिवसापूर्वी घरातील सर्व दागिने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सव्वा लाखांची सोन साखळी. दीड लाखांचे तीन कानातील जोड, असे महागडे आठ दागिने शिवाय रोख १७ लाख ५८ हजार असे एकूण १५ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज आढळून आला नाही.

चोरी झाल्याची खात्री पटल्यावर त्यांनी सलग बाहेगावी कधी गेले हे आठवून २४ ते २७ जूनचे घराबाहेरील सीसीटीव्ही तपासणी केली. त्यावेळी त्यात दोन व्यक्तींनी चप्पल स्टँण्ड मधील किल्ली काढून घरात प्रवेश केला आणि काही वेळाने बाहेर पडले असे लक्षात आले. या चित्रीकरणात दिसत असणारे लोक फिर्यादी यांचा भाऊ अभिषेक याचे मित्र राज मादिवालं आणि साहिल नांदवाल असल्याचे लक्षात आले. याची शहानिशा झाल्यावर त्यांनी बुधवारी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात येऊन तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्ही पाहणी करून तसेच तक्रार अर्जाची दखल घेत राज आणि साहिल यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरज कांबळे हे तपास करीत आहेत.