नवी मुंबई : करोनाकाळात गणेशमूर्ती उंचीवर घलण्यात आलेली मर्यादा यंदाही नवी मुंबईत कायम राहणार आहे. महापालिका प्रशासनाने आपली नियमावली जाहीर केली असून घरगुती गणेशमूर्ती या दोन तर सार्वजनिक गणेशमूर्ती या चार फुटांच्याच असतील. तसेच शाडू किंवा कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी असे आवाहन केले आहे.

करोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे २०२० पासून गणेशोत्सव सध्या पद्धतीने आणि नियमांच्या चौकीत राहून साजरा करण्यात येत आहे. या वर्षी गणेशोत्सवापूर्वी चौथी लाट येऊन ती आता ओसरत आहे. शहरात चारशेपर्यंत गेलेले दैनंदिन करोना रुग्ण आता ५० पर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होईल असे संकेत मिळत होते. मात्र नवी मुंबई महापालिकेने २९ जून २०२१ अन्वये शासनाच्या गृह विभागाकडून करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना यंदाही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवात शाडू आणि कागदी लगद्याच्या आशा पर्यावरणपूरक कमी उंचीच्या मूर्ती असाव्यात अशी नियमावली जाहीर केली आहे.
महापालिका प्रशासनाने पीओपीच्या मूर्ती नसाव्यात आशा सूचना दिल्या असून शाडू आणि कागदपासून बनविलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मूर्ती बनवण्यावर भर देण्यात येईल असे श्री गणेश मूर्तिकार संघटना, नवी मुंबईचे अध्यक्ष संतोष चौलकर व मूर्तिकार मयूरेश लोटलीकर यांनी सांगतले.

शासन नियमावलीनुसार यंदाही गणेशोत्सव पर्यावरणपूरक तसेच मूर्तीची उंची मर्यादा कायम ठेवण्यात आल्या आहेत. घरगुती गणेशमूर्ती २ तर सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फुटांपर्यंतच असाव्यात आशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका