कोपरखैरणेतील रुग्णालय दीड वर्ष बंद
अहिल्याबाई होळकर माता-बाल रुग्णालय, कोपरखैरणे

कोपरखैरणे येथील महापालिकेच्या अहिल्याबाई होळकर माता-बाल रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. रुग्णालयाच्या इमारतीचे पालिकेने दोनदा स्ट्रक्चरल ऑडिट केले. मात्र दोन्ही अहवालांत तफावत आढळली. इमारत वापरायोग्य न राहिल्याने दीड वर्षांपासून रुग्णालय बंद ठेवण्यात आले आहे. रुग्णांना वाशी किंवा ऐरोलीतील रुग्णालयांत जावे लागत आहे. या इमारतीची दुरुस्ती होऊन रुग्णालय सुरू कधी होणार, असा प्रश्न परिसरातील रहिवाशांना पडला आहे.

१९९५च्या सुमारास सिडकोने या इमारतीचे पालिकेकडे हस्तांतर केले. इमारतीचे बांधकाम करणाऱ्या तन्वर कन्स्ट्रक्शन कंपनीला सिडकोने काळ्या यादीत टाकले आहे. सुरुवातीपासूनच या इमारतीत पाण्याच्या टाकीला गळती, इमारतीच्या छतातून गळती, अंतर्गत भिंतींतून पाणी पाझरणे अशा समस्या होत्या. भिंतींच्या बांधकामात खाडीच्या रेतीचा जास्त वापर करण्यात आल्याने सतत ओलावा असे. त्यामुळे कुबट वास येत असे. प्लास्टर पडण्यासारख्या समस्या उद्भवत. त्यामुळे पालिकेचे डॉक्टर येथे राहण्यास नकार देत. २००६-०७ साली ही इमारत वापरण्यास योग्य नाही, अशी तक्रार करण्यात आली.  त्या वेळी प्रशासनाने आरसीसी कन्सल्टंट नेमून त्याच्या सल्ल्याने डागडुजीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केला.त्यानंतरही या समस्या जैसे थे होत्या.

इमारत पुनर्बाधणीसाठी रुग्णालय दीड वर्षांपासून बंद आहे. मध्यंतरी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले.

त्या अहवालानुसार इमारतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र हा निर्णय घेण्यापूर्वीही पालिकेने अशाच एका खासगी संस्थेतर्फे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यात इमारत वापरायोग्य नाही, असा अहवाल देण्यात आला होता. दोन अहवालांत भिन्नता का, असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.

इमारतीच्या सळ्या गंजल्या आहेत. स्तंभांना तडे गेले आहेत. दुमजली इमारतीत ५० खाटांची सोय होती. त्यात पॅथॉलॉजी, ऑपरेशन थिएटर, औषधे, निवासी डॉक्टरांसाठी राहण्याची सोय अशी व्यवस्था होती. सुमारे दोन लाख लोकसंख्येचा कोपरखैरणे विभाग तसेच घणसोली व महापे येथील रुग्णही या रुग्णालयावर अवलंबून होते.

त्यांची स्वस्त उपचारांअभावी गैरसोय होत आहे. त्यांना वाशी, ऐरोली येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. वाशी संदर्भ रुग्णालयातून रुग्णांची रवानगी खासगी रुग्णालयांत होत असल्याने नागरिकांची फरपट होत आहे. रविवारी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती, एका नागरिकाने दिली.

पालिकेला स्ट्रक्चरल ऑडिट करायचेच होते तर एखाद्या सरकारी संस्थेमार्फत किंवा नामांकित खासगी संस्थेकडून करून घ्यायला हवे होते. २००७-०८ सालीसुद्धा पालिकेने रुग्णालयावर मोठा खर्च केला, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्याचीच पुनरावृत्ती झाल्यास जबाबदार कोण?

– देविदास हांडे, नगरसेवक

येथील कर्मचारी ऐरोलीतील रुग्णालयात नेमले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार इमारतीची डागडुजी करून ती वापरता येणार आहे. त्याचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. भिंतींतून, स्लॅबमधून होणारी गळती बंद करण्यासारखी कामे आम्ही करून घेणार आहोत.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त