उरण तालुक्यात भातशेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या शंभर टक्के आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या या शेतीव्यवसायाभोवती वाढत्या उद्योगांचा विळखा घट्ट असल्याने शेतकऱ्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात घटली आहे. भातशेतीसाठी मजुरीसह प्रतिएकर चार ते साडेचार हजार रुपये खर्च येतो. याच शेतीतून तयार होणाऱ्या पिकाला तीन हजार रुपये दर मिळत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तोटय़ाचीच शेती करावी लागत आहे.मात्र अनेक वर्षांपासून भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.अशा शेतकऱ्यांनाही उत्पन्नावर आधारित दर मिळावा ही मागणी शेतकरी करू लागले आहेत.
उरणमधील पश्चिम विभागात मोठय़ा प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. त्यामुळे येथील मूळ व्यवसाय असलेली शेती संपुष्टात आली आहे. तर तालुक्यातील जेएनपीटी या जागतिक बंदरामुळे औद्योगिकीकरणाचा विस्तार होऊ लागला असून तो उरणच्या पूर्व विभागातही वाढू लागला आहे. त्यामुळे शेतीखालील क्षेत्रातही घट होऊ लागली आहे. सध्या उरण तालुक्यातील २६०० हेक्टर जमिनीवर भाताचे पीक घेतले जात आहे. उद्योग आल्याने शेतीवर काम करणारी शेतकऱ्यांची मुलेही नोकरी करीत आहेत. त्यामुळे शेतीवर काम करणाऱ्यांची संख्या आधीच कमी झालेली आहे. तर दुसरीकडे पूर्वी एकमेकांच्या शेतात काम करून जोळीने आपली शेती करण्याची पद्धतही मोडीत निघू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या व्यवसायासाठी आता मजुरांवर अवलंबून राहावे लागत आहे. उद्योगात कंत्राटी पद्धतीची का होईना कायमस्वरूपी नोकरी मिळत असल्याने गावातील मजूर कंपनीत नोकरी करीत आहेत. त्याचाही परिणाम मजुरांमध्ये घट होण्यात झाला आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेल्या मजुरांनी आपली मजुरी वाढविल्याने शेतकऱ्यांना ती परवडत नसल्याने शेतीकामावर परिणाम झाला आहे. सध्या उरणमध्ये शेतीसाठी ३५० ते ४०० रुपयांची मजुरी मोजावी लागत असल्याची माहिती उरण पूर्व विभागातील खोपटा येथील अनंत ठाकूर यांनी दिली. त्याचप्रमाणे संपूर्ण कोकण व विदर्भातील काही जिल्हय़ात भाताचे पीक घेतले जात असताना राज्यात केवळ ऊस, कापूस या पिकाच्या दराची चर्चा आणि दरवाढ केली जात असल्याचीही खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. येथील शेतकरी जोडव्यवसाय करीत असल्याने व आपले शेतीवर प्रेम असल्यानेच तोटय़ात जाऊनही शेतीचे पीक घेत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. तसेच भातशेतीला योग्य हमीभाव नसल्याने खर्च करूनही शेतकऱ्याच्या हाती काहीच पडत नसल्याचे मत पुनाडे येथील शेतकरी अनिरुद्ध ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.