बासमती तांदूळ, व्यवस्थित शिजलेले चिकन आणि मसाल्यांच्या सुगंधाने दरवळणारी बिर्याणी म्हणजे मोघलाई पदार्थाची मेजवानीतील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ. त्यामुळे हा शाही साज लाभलेला पदार्थ खवय्यांना पेश करण्यासाठी अनेक हॉटेल्स आणि बिर्याणी सेंटर्स धडपडत असतात. नवी मुंबईतील घणसोली येथील बिस्मिल्ला बिर्याणी केंद्राला ही कला उत्तम अवगत झाली आहे. म्हणूनच ही बिर्याणी नवी मुंबईच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरांतूनही खवय्यांची गर्दी खेचत आहे.

अतिक अहमद हा उत्तरप्रदेशातील तरुण बेताच्या परिस्थितीत गुजराण करणाऱ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी २००१मध्ये मुंबईत आला. नव्या शहराबद्दल काहीच माहिती नव्हती. कोणता व्यवसाय करावा याचा ताळमेळ लागत नव्हता. भांडवल ही पुरेसे नव्हते. काही वर्षे हॉटेल, चहा, वडापावच्या टपरीवर कामे केली आणि लखनऊची खासियत असलेली बिर्याणी बनवण्याचा व्यवसाय करण्याचा बेत ठरला. गावी लग्नसमारंभात जेवण बनविण्याचा अनुभव होता. त्यांना एका मित्राने मदतही केली. सुरुवातीला चेंबूर येथे छोटेखानी स्टॉल टाकला, पण जम बसला नाही. वर्षभरात तो स्टॉल बंद करावा लागला. त्यानंतर २००९ साली घणसोली स्टेशनच्या डाव्या हाताला लागूनच असलेल्या दर्गा परिसरात त्याने बिस्मिल्ला बिर्याणी नावाने व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच जम बसला.

बिस्मिल्लाची बिर्याणी ही घणसोलीची शान म्हणून ओळखली जाते. किंमत किफायतशीर असल्यामुळे आणि चवही उत्कृष्ट असल्यामुळे ती सर्व आर्थिक स्तरांतील ग्राहक बिस्मिल्ला बिर्याणीला लाभले आहेत. नवी मुंबई, पनवेल, ठाणे परिसरांतील लोक येथे बिर्याणीची चव चाखण्यासाठी येतात.

सुरुवातीला छोटय़ा स्वरूपात असलेल्या या व्यवसायाने आता व्यापक रूप धारण केले आहे. ऐरोली, ठाणे, विक्रोळी येथे या बिर्याणीची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. आणखी एक वैशिष्टय म्हणजे इथे मदतीसाठी ठेवलेली ६-७ मुलेही लखनौचीच आहेत. बिर्याणीचा दर्जा आणि प्रमाण उत्तम असल्यामुळे ग्राहकांना पुन:पुन्हा खेचून आणणे त्यांना शक्य झाले आहे. दग्र्यात नमाज पढायला आलेले लोक या बिर्याणीची चव चाखल्याशिवाय घरी परतत नाही. थर्टी फर्स्ट, ईद यांसारख्या प्रसंगी तर इथे गर्दी लोटते. खरे तर वडापाव हा मुंबईकरांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणून ओळखला जातो. पण आपण आपल्या गावची खासियत मुंबईत रुजवावी या विचाराने लखानौचा तडाका कायम ठेवत हा बिर्याणी उद्योग थाटल्याचे, शकिल अहमद सांगतात.

अशी बनते बिर्याणी

सकाळी ९ वाजता बिर्याणी बनवण्यासाठीचे सगळे साहित्य सज्ज ठेवले जाते. रोज ५० किलो तांदूळ आणि ५० कोंबडय़ा लागतात. शुक्रवार आणि रविवारी जास्त मागणी असते. या बिर्याणीचे वैशिष्टय़ म्हणजे ती गॅसऐवजी कोळशाच्या शेगडीवर शिजवली जाते. घरगुती मसाले त्यात वापरले जातात. खास लखनौचा तडका हे या बिर्याणीचे वैशिष्टय़. त्यामुळे परिसरात बिर्याणीचा गंध दरवळतो.

बिर्याणीचे प्रकार

चिकन, मटन, व्हेज, दम, चिकन कोल्हापुरी, तंदुरी, बोनलेस अशा विविध प्रकारांत बिर्याणी मिळते. ‘झमझम बिर्याणी’ ही इथली खासियत आहे. ऑर्डरनुसार चिकन लॉलीपॉप, चिकन लेग पिस, कुर्मा, मटन कुर्मा हे प्राकरही बनवले जातात.

बिस्मिल्ला बिर्याणी

  • स्थळ घणसोली शॉप नं-१४, रेल्वे स्थानकाच्या डाव्या बाजूला, दग्र्यासमोर
  • वेळ- सकाळी ९ ते रात्री ११.