कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीमुळे शेतीला संजीवनी; व्यवस्थापन-विद्यार्थ्यांचा उपक्रम
कचऱ्याच्या समस्येवर कचराभूमी हा हाच एक उपाय नसून अगदी घराशेजारी कचऱ्याची समस्या संपुष्टात आणता येऊ शकते, असा विश्वास वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली तर ती एक प्रकारची संपत्ती ठरू शकते, याचे उदाहरण घालून दिले आहे.
महाविद्यालय व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांनी मिळून महाविद्यलयाच्या प्रांगणात कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करीत आहेत. तीन फूट उंच आणि तीन फूट लांब खड्डा तयार करून त्यात अनेक प्रकारचा कचरा टाकला जात आहे. यात ओला कचरा, झाडांचा पाचोळा यांचा समावेश आहे. त्यातून सेंद्रिय खताची निर्मिती केली जात आहे. चार वर्षांपासून हे खत तयार केले जात आहे. महाविद्यालयातील बागेमधील वृक्षांना हे खत घातले जात आहे. त्यामुळे ही झाडे जोमदार वाढीस लागली आहेत. कचऱ्याचे योग्य पद्धतीने विघटन होणे गरजेचे असल्याचे तत्त्व येथील विद्यार्थ्यांवर रुजवले जात आहे.
‘शून्य कचरा’ तयार करण्याचा मानस आहे. महाविद्यालयाच्या आवारातच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्यातून कंपोस्ट खत तयार केले जात आहे. याशिवाय कागदाचा पुनर्वापर करण्यावर व्यवस्थापन भर देत आहे. – व्ही. एस. शिवणकर, प्राचार्य, कर्मवीर महाविद्यालय