जास्तीत जास्त लोकांना कळावी या दृष्टीने प्रत्येक भाषेची प्रमाण भाषा निश्चित केली जात असून प्रमाण भाषेत लिहिल्यास त्याचे आकलन अधिकाधिक लोकांना होते. त्यामुळे प्रमाण भाषेत लिहिणे व त्याचे नियम पाळणे गरजेचे असते. या दृष्टीने कोणत्याही भाषेचे व्याकरण हा अत्यंत महत्वाचा विषय असून, तो जर हसत खेळत मनापासून शिकला तर त्यामध्ये गोडी वाढते, असे मत व्यक्त करीत भाषा अभ्यासक वैभव चाळके यांनी सहज सोप्या पद्धतीने दिलखुलासपणे महापालिका कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शुद्ध लेखनाचे धडे दिले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांत भाषा अभ्यासक वैभव चाळके यांनी शुद्ध लेखनाचे नियम या विषयावर सोपी उदाहरण देत शुद्ध कसे लिहावे या विषयी मार्गदर्शन केले. शुद्ध म्हणजे पवित्र नाही, तर अचूक हे सुरुवातीलाच विषद करीत सध्या प्रमाण मराठी भाषेऐवजी मराठी इंग्लीश मिश्रित मिंग्लीश ही वेगळीच भाषा ऐकायला मिळते, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – मोदींच्या सभेसाठी नवी मुंबईतून १४२ गाड्यांचा ताफा रवाना

सध्या जगण्याची भाषा महत्वाची झाली असून आपली जीवनभाषा आपल्याला कळायला हवी, असा हा काळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बहुतांशी मुले इंग्रजी माध्यमांत शिकतात व त्याना मराठी भाषाही शिकविली जाते. मात्र, घरात त्यांच्याशी बोलताना इंग्रजी मिश्रित मराठीत बोलले जाते, त्यामुळे धड ना इंग्रजी, ना मराठी, अशा संभ्रमात त्या मुलाचा भाषा विकास होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुलाच्या भाषिक जाणिवा विकसित होण्याच्या दृष्टीने पालकांनी सजग रहावे, असेही चाळके म्हणाले.

हेही वाचा – नवी मुंबई : जुना बटाटा हंगाम लवकरच संपणार; नवीन बटाटा पेक्षा जुना बटाट्याचे दर अधिक

मराठी शुद्ध लेखनाचे १८ शासकीय नियम दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देत अविष्कृत करताना वैभव चाळके यांनी मराठी भाषेच्या ऐश्वर्य संपन्न नजाकतीचे दर्शन घडविले. हस्व किंवा दीर्घ वेलांटी, तसेच ऊकार याबाबत बहुतांशी लोकांमध्ये संभ्रम असून, त्या दृष्टीने महत्वाचे तीन नियम त्यांनी सांगितले. शुद्ध लेखनामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली भाषा अचूक पोहचते, असे भाषा अभ्यासक वैभव चाळके यांनी यावेळी सांगितले.