पालिकेचे रुग्णालय.. दुपारची वेळ.. रुग्णांचे प्रमाण तुरळक. तळमजल्यावरील स्त्रीरोग बाह्य़रुग्ण विभागाबाहेर सफाई कामगार मोबाइलमध्ये मग्न. केसपेपर काढण्यासाठी एकच काऊंटर, पण तिथे कर्मचारी नाही. बालरोग बाह्य़रुग्ण विभागात एकच रुग्ण. सफाई कामगारांचे गप्पांचे फड रंगलेले. एक सफाई कामगार महिला वरच्या मजल्यावर घेऊन जाताना म्हणते, साहेबांसाठी मासे आणले का?.. हा प्रसंग आहे बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयातला. रुग्णालय केवळ नावापुरतेच आहे.
बेलापूर येथे पूर्वी जिल्हा परिषदेचे जुने कौलारू प्राथमिक आरोग्य केंद्र होते. त्यात स्पर्शदंश, श्वानदंश लसीकरण, शवविच्छेदन, प्रसूती या सुविधा उपलब्ध होत्या. येथे नेरुळ, शिरवणे, दिवाळे, आग्रोळी, शाहाबाज, फणसपाडा, किल्ले गावठाण, पनवेल, उरण या परिसरातील रुग्ण येत. ग्रामपंचायतीचे पालिकेत रूपांतर झाल्यानंतर सुमारे २० वर्षांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालिकेला हस्तांतर करण्यात आले. हस्तांतर झाल्यानंतरही पाच वर्षे या आरोग्य केंद्राचे काम सुरू करण्यात आले नाही. २००९ साली या इमारतीच्या कामाला सुरुवात झाली. हे काम पूर्ण करण्यासाठी पाच वर्षे लागली. दोन लाख लोकसंख्येच्या बेलापूर विभागासाठी तीन मजली, ५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. या इमारतीत दोन वर्षांपासून बाह्य़रुग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयाचे अद्याप नामकरण करण्यात आलेले नाही. येथे पहिल्या मजल्यावरील प्रसूती आणि शस्त्रक्रियापूर्व कक्ष बंद आहेत. दुसऱ्या मजल्यावरील प्रसूतिपश्चात कक्ष बंद आहे. तिसरा मजला वैद्यकीय भांडार म्हणून वापरला जातो. तेथे स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने उपचार करण्यात येत नाहीत. रुग्णालयासाठी आवश्यक फर्निचर, उपकरणे आणण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. आलेल्या रुग्णांना वाशी, पनवेल किंवा खासगी रुग्णालयांचा संदर्भ देण्यात येतो. येथील कर्मचाऱ्यांना नेरुळ येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
हे रुग्णालय अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नाही. त्यासाठी जाहिरात द्यावी लागेल. फर्निचर वगैरे आणण्याचे काम सुरू आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या नेमणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. कायमस्वरूपी नियुक्ती करण्यासाठी ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बिंदु नामावलीकरणाला शासकीय मान्यता आवश्यकता आहे. नियुक्त्यांबाबत प्रक्रिया सध्या सुरू आहे. सर्व उपकरणांबाबत एकत्रच निविदा काढण्यात येईल. – दीपक निकम, मुख्य वैद्यकीय अधिकारी
गरजू महिलांना उपचार मिळणे गरजेचे आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला; परंतु त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ऑक्सिजन लाईन नाही, स्त्रीरोगतज्ज्ञ नाही अशी कारणे सांगून चालढकल करण्यात येते. अडचणीच्या वेळी महिलांना वाशी, नेरुळ येथे पाठवण्यात येते. – पूनम पाटील, नगरसेविका, बेलापूर माता-बाल रुग्णालय