नवी मुंबई- जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा म्हणून एपीएमसीची पाचही घाऊक बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी द्यायची आणि या समितीत दिवसरात्र कष्ट करणाऱ्या माथाडी, मापाडी या घटकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास नाकारायचा हा परस्परविरोधी निर्णय तात्काळ रद्द करून कडक निर्बंधांच्या या काळात माथाडी व मापाडी कामगारांना रेल्वे, बस प्रवासात सूट देण्यात यावी अशी मागणी माथाडी संघटनेने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार रात्री उशिरापर्यंत निर्णय न घेतल्यास शनिवार व रविवारी काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुर्भे येथील भाजी, फळ, अन्नधान्य, कांदा बटाटा, मसाला या पाच घाऊक बाजारपेठेत काम करणारे माथाडी व मापाडी कामगारांना शुक्रवारी सानपाडा रेल्वे स्थानकावर पोलिसांनी प्रवास करण्यास मज्जाव केला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माथा़डी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी सानपाडा रेल्वे स्थानकात धाव घेतली. राज्य सरकारने संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्राला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या या पाच घाऊक बाजारपेठा सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र या घाऊक बाजारपेठेत सर्व प्रकारची कामे करणारे माथाडी, मापाडी, वारणार, साफसफाई कामगार, वाहतूकदार यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केलेला नाही. या घटकाशिवाय बाजारपेठेतील पानदेखील हलत नसताना बाजारपेठा सुरू ठेवा पण यासाठी काम करणाऱ्या कामगारांचा अत्यावश्यक सेवेत प्रवेश न करता त्यांना सार्वजनिक वाहतूक सेवेत प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे माथाडी कामगार संतप्त झाले असून या निर्णयाच्या विरोधात माथाडी भवनमध्ये एक तातडीची बैठक घेऊन शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत हा निर्णयात बदल न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे. गेल्या वर्षीदेखील या घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला नव्हता.

माथाडी कामगार जीव मुठीत घेऊन कामावर येत आहेत. प्रत्येक कामगारांकडे खासगी प्रवासाची व्यवस्था नाही. त्यामुळे सार्वजनिक व्यवस्थेशिवाय दुसरा पर्याय नाही. या सेवेत अत्यावश्यक सेवेकरी म्हणून समावेश नसल्याने रेल्वे तसेच राज्य पोलीस कामगारांना अटकाव करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत तात्काळ समावेश करावा, अन्यथा काम बंद करावे लागेल.

-नरेंद्र पाटील, नेते, माथाडी संघटना

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mathadi workers stop work warning akp
First published on: 24-04-2021 at 00:02 IST