पनवेल महापालिकेविरोधात राजकीय पक्षांचा संताप
नव्याने झालेल्या पनवेल महापालिकेतील अधिकाऱ्यासह लहान कर्मचाऱ्यांमधील कामाच्या अनुभवातील मर्यादा तसेच अपुऱ्या मनुष्यबळामुळे चालक व लिपिकांवर निवडणुकीची जबाबदारी सोपवणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमधील बट्टय़ाबोळ मंगळवारी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या याद्यामधून उघड झाला. या याद्यामंध्ये एका प्रभागातील सुमारे तीन हजार मतदारांना दुसऱ्या प्रभागाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असून निधन झालेल्या अनेक लोकांचाही समावेश या याद्यांमध्ये केला गेला आहे. याशिवाय फक्त चार दिवसात हजारो मतदारांनी या प्रारूप यादीबद्दल हरकती नोंदवायच्या असल्यामुळे सत्तेमध्ये असणाऱ्या भाजप, सेनेसारख्या विविध राजकीय पक्षांनी याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पालिका प्रशासनाला प्रशासकीय काळाच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे शिवधनुष्य उचलायचे असल्यामुळे झालेली घाई आणि प्रशासकीय कामकाजाची संपणारी मुदत यामुळे झालेल्या सावळागोंधळ यामुळे पालिका प्रशासनावर ही वेळ आल्याचा आरोप होत आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना पनवेल पालिकेची भौगोलिक स्थितीची माहिती नसल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे समोर येत आहे. याविरोधात तीव्र विरोधाला आता पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. मतदार याद्यांमधील या गोंधळाविरोधात भाजपनेत्यांनी आक्रमक भूमिका घेताना उपोषणाचा इशारा दिला आहे. तशा स्वरूपाचे पत्रदेखील पालिका प्रशासनातील अधिकारी खाडे यांना देण्यात आले आहे. यावेळी अॅड मनोज भुजबळ यांनी प्रभाग १७ मधून त्याचे नाव जाणीवपूर्वक प्रभाग २० मध्ये स्थलांतरित केल्याचा आरोप पालिका प्रशासनावर केला आहे. तसेच प्रभाग १७ मधील हजारो मतदारांची नावे प्रभाग २० मधील यादीमध्ये असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. असाच प्रकार मनोहर म्हात्रे यांच्याबाबतदेखील घडला असून खांदा वसाहतीमधील मतदारांना थेट पनवेलच्या यादीत जोडल्यामुळे मतदारांना पायपीट करून दुसऱ्या शहरात जावे लागणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे.
या आक्षेपांमध्ये प्रभाग क्रमांक १८ मध्ये शहरातील ७० टक्के भाग व नवीन पनवेल येथील तीन सेक्टर परिसराचा भाग येतो. याच यादीमध्ये पहिल्या पानातील प्रस्तावनेमध्ये कळंबोली गावामधील पोपेटाआळीतील ४० मतदारांचा समावेश आहे. पोपेटाआळी पनेवल शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मतदारांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पनेवलच्या यादीमध्ये तब्बल १५ ते २० नावे दुबार प्रसिद्ध आहेत. तसेच ज्येष्ठ नाटय़ नकलाकार बाळ लखपती यांचे नुकतेच निधन झाले असताना त्यांच्या नावाचा समावेश या यादीत केला आहे.
पालिकेच्या यंत्रणेतही सावळागोंधळ
महापालिकेमध्ये चार लाख २५ हजार ४५३ मतदार आहेत. यांची नावे तपासण्यासाठी पालिकेने पनवेल पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केल्याचे जाहीर केले होते. मात्र हे संकेतस्थळ मंगळवारपासून ठप्प असल्यामुळे नागरिकांनी पेनड्राईव्ह घेऊन पालिकेत खेपा माराव्या लागत आहेत. १८ मार्चपर्यंत सामान्य मतदारांना प्रारूप यादीवर हरकती नोंदवता येणार आहेत. २२ मार्च रोजी प्रभागनिहाय सुधारित मतदार यादी प्रसिद्ध होईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर प्रभागनिहाय मतदान केंद्र मतदार यादी अंतिम प्रसिद्ध होईल.
आजचे आंदोलन उद्यावर
मतदार यादीतील घोळामुळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सुरू केलेले आमरण उपोषण गुरुवारी पनवेल महापालिकेचे नवीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. यादीतील चुकांची दुरुस्ती व्हावी, यासाठी ‘ट्र व्होटर’ या अॅप्लिकेशनवर हरकती नोंदविण्याची अट होती. मात्र हजारोंच्या संख्येने चुका असल्याने लेखी स्वरूपात नागरिकांनी दिलेल्या तक्रारी घ्याव्यात, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. ही मागणी आयुक्त निंबाळकर यांनी मान्य करत शुक्रवारी यावर ठोस मार्ग काढू असे आश्वासन दिले.
