नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रमुख आयटी हब समजल्या जाणाऱ्या ऐरोली, रबाळे, वाशी, कोपरखैरणे आणि तुर्भे विभागांतील व्यावसायिक संकुले आणि आयटी कंपन्यांच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी हातगाड्यांवर अन्न विक्रीचे साम्राज्य उभे केले आहे. या अन्न विक्रेते कोणत्याही आरोग्य तपासणीशिवाय व अनधिकृत गॅस सिलिंडर व शेगड्यांचा वापर करून खुलेआम जेवण तयार करत आहेत. त्यामुळे शहराच्या सार्वजनिक आरोग्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चांगला पगार असूनही अनेक कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचा कल हॉटेल अथवा कँटीनऐवजी रस्त्यावरील हातगाड्यांवर अन्न घेण्याकडे वाढत आहे. ऐरोलीतील माइंडस्पेस परिसरात तर, दुपारी आणि संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावरून चालणेही कठीण होते. या कर्मचाऱ्यांना स्वस्त, चविष्ट आणि वेळ वाचवणारे अन्न हवे असते. मात्र, या अन्नाची स्वच्छता, पाणी व वापरण्यात येणारे साहित्य कोणत्याही निकषांवर उतरते की नाही याचा कोणताही तपास होत नाही. त्यामुळे अनेकदा फूड पॉयझनिंग, डेंग्यू, टायफॉइड आणि गॅस्ट्रोसारखे आजार वाढण्यामागे या अन्नाचीच भूमिका असते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

तसेच, कारवाईदरम्यान नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, महापालिकेच्या अन्न सुरक्षा विभागानेही काही सॅम्पल जप्त केले आहेत. परंतु, सर्वांत चिंतेची बाब म्हणजे, अशा मोठ्या प्रमाणावर कारवाई करूनही काही दिवसांत हेच स्टॉल्स पुन्हा त्याच ठिकाणी उभे राहतात. स्थानिक प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा, राजकीय हस्तक्षेप आणि यंत्रणेतील ढिसाळपणा यामुळे कारवाईचा परिणाम तात्पुरताच राहतो, असा स्थानिकांचा आरोप आहे.

महापालिकेची मोठी कारवाई

काही दिवसांपूर्वी ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या सुमारास एका चायनीज बनवणाऱ्या गाडीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने १२ आणि १३ जून रोजी शहरभरात मोठी धडक कारवाई केली. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईअंतर्गत पालिका क्षेत्रातील एकूण १९० अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यातील १६६ अन्नपदार्थ विक्रेते. १५६ गॅस सिलिंडर, ६७ शेगड्या, ११ हातगाड्या जप्त पालिकेकडून जप्त करण्यात आल्या. तर सर्व साहित्य डम्पिंग यार्डमध्ये जमा करण्यात आले.

आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न

या हातगाड्यांमुळे केवळ स्वच्छतेचा नव्हे तर वाहतूक कोंडी, पार्किंगची अडचण, अग्निशमन सुरक्षेचा धोका आणि पादचाऱ्यांच्या हालचालींनाही अडथळा होतो. हे सर्व व्यवसाय कोणत्याही नियोजनाच्या किंवा झोनिंगच्या नियमांचे पालन न करता चालवले जातात. त्यामुळे शहरी नियोजनातील अपयश, नागरिकांची असंवेदनशीलता आणि प्रशासनाचा कमी दृष्टिकोन यामुळेच व्यावसायिक संकुलांच्या आजूबाजूला अस्वच्छतेचा विळखा निर्माण झाला आहे. हा केवळ नगररचनेचा प्रश्न न राहता, शहराच्या सुदृढतेचा आणि प्रतिष्ठेचाही प्रश्न बनला आहे.

ऐरोली येथील गॅस सिलेंडर स्फोटाची घटना घडल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई जोरदार करण्यात आली. त्याचसोबत नियमांची पायमल्ली करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त लवकरच या सर्व अनधिकृत पद्धतीने व्यावसाय करणाऱ्यांचे समुपदेशन करणार असून, त्यानंतरही जर कोणी असे व्यवसाय करताना आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल. – सुनील काठोळे, विभाग अधिकारी, ऐरोली