यादवनगरमधील ५०० बेकायदा झोपडय़ा जमीनदोस्त; भंगारच्या १५० दुकानांवरही कारवाई

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकत्याच भेट दिलेल्या यादवनगर परिसरातील २००० नंतरच्या सुमारे ५०० बेकायदा झोपडय़ा बुधवारी जमीनदोस्त करण्यात आल्या. भंगार सामानाची १५० दुकानेही हटवण्यात आली. पालिका आणि एमआयडीसीने एकत्रितपणे संयुक्त कारवाई करून हा भूखंड अतिक्रमणमुक्त केला.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एमआयडीसीच्या जागेवर भंगारमाफिया व भूमाफियांनी बेकायदा  झोपडय़ा थाटल्या होत्या. त्या गरिबांना विकण्याचा धंदा तेजीत होता. पालिका आयुक्त मुंढे यांनी एमआयडीसीच्या जागेवरील २००० नंतरच्या बेकायदा झोपडय़ा पाडण्याचे आदेश दिल्यानंतर बुधवारी पालिकेने ही कारवाई केली.

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी १९६० च्या दशकात एमआयडीसीने विकत घेतल्या होत्या. पण एमआयडीसीचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या भूखंडावर भूमाफियांनी बेकायदा झोपडय़ा बांधून त्या गरजूंना विकल्या. परिणामी या परिसराला अनधिकृत झोपडय़ांचा विळखा पडला होता.

[jwplayer iDKuun7v]

शनिवारी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झोपडपट्टी परिसरात ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमांतर्गत दौरा केला. त्यांनतर शहरामध्ये वाढलेल्या झोपडय़ा पाहून २००० नंतरच्या अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी अनाधिकृत झोपडय़ांवर कारवाई करण्यात आली.

पालिकेच्या या कारवाईमुळे झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत. अनधिकृत झोपडय़ांमुळे पालिकेच्या पायाभूत सोयीसुविधांवर ताण येत आहे. पण आता अनाधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे पालिकेवरील ताण कमी झाला आहे.

यापुढे झोपडपट्टीच्या परिसरात एक जेसीबी ठेवण्यात येणार आहे. अतिक्रमण केल्याचे आढळले, की लगेचच त्यावर कारवाई करण्यात येईल आणि भूखंड मोकळे ठेवण्यात येतील. बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईसाठी ४ जेसीबी, ५० कामगार व मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा तनात करण्यात आला होता.

अमरिश पटनिगीरी, उपआयुक्त, परिमंडळ २

[jwplayer zn4weubR]