नवी मुंबई : नेरूळ सेक्टर–१ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याभोवती नवी मुंबई महापालिकेने रविवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास १५ फुटी लोखंडी जाळी उभी करून संपूर्ण परिसर बंदिस्त केल्यानंतर नवी मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. काही दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या अचानक अनावरणानंतर प्रशासनाने केलेली ही कारवाई म्हणजे “चोर-दरोडेखोरांसारखी” असल्याचे म्हणत मनसेने प्रशासनाच्या कारवाईविरोधात जोरदार निषेध व्यक्त केला आहे.
चार महिन्यांहून अधिक काळ महाराजांचा पुतळा झाकून ठेवण्यात आल्यानं शिवभक्तांमध्ये असलेली नाराजी वाढत असतानाच मनसेने रविवारी पुतळ्यावरील मळके कापड काढून जलाभिषेक करत अनावरण केले होते. महापालिकेच्या परवानगीशिवाय हे अनावरण केल्याचा आरोप ठेवत नेरूळ पोलिसांनी मनसे नेते अमित ठाकरे आणि ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. यानंतर अमित ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून, “महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा असेल, तर भविष्यातही असे हजारो गुन्हे करीन,” अशी भूमिका घेत प्रशासनाला खुले आव्हान दिले.
या पार्श्वभूमीवर पुतळा पुन्हा बंदिस्त करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाने वाद आणखी चिघळला आहे. रात्रीच्या वेळी स्मारकाभोवती अचानक उभारलेल्या जाळीमुळे स्थानिक नागरिकांसह शिवभक्तांत संतापाची लाट उसळली आहे. चौकात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचेही दिसून आले आहे.मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी या कारवाईवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.“पुतळा पुन्हा बंदिस्त करण्यामागचा आदेश कोणाचा आहे,हे नवी मुंबईतील जनता जाणते. स्मारक एकदा खुले झाल्यानंतर पुन्हा जाळी लावणे म्हणजे शिवभक्तांच्या भावनांचा अवमान आहे. हे प्रशासनाचे मनमानीपण आहे.‘जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी’ अशी ताकीद आम्ही देतो,” असे काळे म्हणाले आहेत.
यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत, “हा महाराजांचा महाराष्ट्र आहे. कितीही आदेश काढा, कितीही अडथळे आणा… महाराष्ट्र सैनिक गनिमिकाव्याने हे स्मारक पुन्हा खुले करणारच.” असा इशारा काळे यांनी प्रशासनाला दिला आहे. “इतिहास नेहमी लढणाऱ्यांची दखल घेतो, पळणाऱ्यांची नाही,” असे म्हणत गजानन काळे यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे.
महापालिकेने मात्र पुतळ्याभोवतीची बाकी कामे सुरू असल्याचे कारण देत जाळी उभारण्यात आल्याचा दावा केला आहे. कामे पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत लोकार्पण करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. परंतु या स्पष्टीकरणावर मनसेसह स्थानिक शिवभक्तांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून नेरूळसह संपूर्ण नवी मुंबईत पुढील काही दिवस राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
