पनवेल : मुंबई गोवा महामार्गाचे काम १५ वर्षानंतरही अपूर्णच आहे. नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी पनवेल ते रत्नागिरी पाहणी दौरा केल्यानंतर या महामार्गाचे काम ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झाले असून पुढील पाच महिन्यात उर्वरीत कामे पूर्ण होईल असा दावा मंत्र्यांनी केला आहे. मात्र कोकणाची विकासवाट ठरणा-या या महामार्गाला अजून पथदिवे नाहीत आणि पावसाळी पाणी जाण्यासाठी नाले बांधले नाहीत.

काॅंक्रीटच्या महामार्गाशेजारी वाहन उभे करण्यासाठी साईड पट्टीवर मातीचा भराव केल्यामुळे पावसाळ्यात वाहनांची चाके रुतून येथे अपघात होतात. पाच महिन्यात महामार्गाचे काम पूर्ण करुन पथकर वसुलीसाठी टोलधाडीच्या तयारीत असलेल्या सरकारी यंत्रणेने हा महामार्ग सुरक्षित करण्यासाठी तेवढ्याच तत्परतेने प्रयत्न न केल्यास या महामार्गावरील प्रवास धोकादायक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महामार्ग प्राधिकरणाने यामधील काही ठिकाणी पावसाळी नाले व सेवा रस्त्यांच्या काॅंक्रीटीकरणाची कामे करण्यासाठी दिडशे कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र याबाबत अजूनही या प्रस्तावाला मंजूरी होऊन याची निविदा प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे अगोदर महामार्ग सूरक्षित बनवा नंतरच टोलधाडीची तयारी करा अशी मागणी कोकणवासियांकडून होत आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर  रस्त्याची जबाबदारी आहे. यामध्ये ४२ किलोमीटरचे दोन पॅकेज करण्यात आले असून पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन पॅकेजमधील काम अंतिम टप्यात असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. यातील पहिल्या पॅकेजच्या कामात गडब येथे ३०० मीटर लांबीच्या लहान उड्डाणपुलाचे ५० टक्के  काम अंतिम टप्यात आहे. पॅकेजमधील इतर कामे झाली आहेत. गणेश उत्सवापूर्वी कोकणात जाणा-या गणेशभक्तांसाठी गडब पुलावरील एक बाजू वाहनांसाठी खुली करण्याचे नियोजन महामार्ग प्राधिकरणाने आखले आहे. गडब येथील महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविण्याचे काम प्राधिकरण हाती घेणार आहे. पहिल्या पॅकेजमधील ४२ किलोमीटर महामार्गाशेजारी २३ किलोमीटरवर सेवा रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्यात आहे. २१ किलोमीटरच्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत २ किलोमीटरच्या सेवा रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी अतिरीक्त प्रस्ताव प्राधिकरणाच्या मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. जिते गावाजवळ, कांदळेपाडा आणि रोहित कॉम्प्लेक्स येथे भूसंपादनाची अडचणीमुळे हे काम थांबले आहे.  

तसेच दूस-या पॅकेजमधील कासू ते इंदापूर या ४२.३ किलोमीटर अंतराच्या पल्यापैकी ३८ किलोमीटरच्या मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित पाच किलोमीटरचे काम सुरू आहे. ही कामे पादचारी मार्ग, भुयारी मार्ग व इतर कामे आहेत.  नागोठणे, कोलेटी, तळवली येथे ही कामे सुरू आहेत. या पॅकेजमध्ये १६ किलोमीटर अंतरावर सेवा रस्ता असून यापैकी ६ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी सेवा रस्त्याला खड्डे पडले असुन ते गणेशोत्सनापूर्वी भरण्याचे नियोजन प्राधिकरणाने केले आहे.

हा महामार्ग ८.७५ मीटर रुंदीचा बांधला जात आहे. यामध्ये दोन मार्गिकांसाठी पाच मीटर अंतर, त्यानंतर १.७५ मीटरची साईड पट्टी हे सर्व काॅंक्रीटचे असणार आहे. त्यानंतर १ मीटर अंतराची साईड पट्टी माती व मुरुमची असते. हीच साईड पट्टी काॅंक्रीटची बांधल्यानंतर टोल नाक्यावरून पथकर वसुली सुरू करण्याचे स्वप्न पहा अशी आर्जवी कोकणवासियांकडून केली जात आहे.

इंदापूरपासून पुढे ३५५ किलोमीटर अंतराच्या मुंबई गोवा महामार्गाची जबाबदारी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. यापैकी ३३४ किलोमीटरचे काम झाले असून २१ किलोमीटरचे काम सुरू असून ही कामे डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती या विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी दिली. 

मुख्यमंत्र्यांनी कबूतखान्यासाठी बैठक घेतली. महादेवी हत्तींनीसाठी कोल्हापूरकरांच्या सोबत राहीले. मात्र मुंबई गोवा महामार्गाच्या कामादरम्यान ४,५३१ लोकांचा बळी गेला. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना तातडीची बैठक लावावीशी का वाटत नाही. कोकणातील अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांसाठी आम्ही झगडतोय, ही माणसे नाहीत का, कोकणी माणसाला सूरक्षित महामार्गाची अपेक्षा आहे. सध्या जो रस्ता बनवला म्हणतात त्या रस्त्यावर क्रॅक पडलेत, भविष्यातील हे खड्डे आहेत. मृतांच्या वारसदारांना मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावासुरेंद्र पवार – कार्याध्यक्ष, जन आक्रोश समिती