Navi Mumbai International Airport Inauguration Date: गेल्या अनेक वर्षांपासून ज्या विमानतळाची राजकीय आणि स्थानिक पातळीवर फक्त चर्चा ऐकायला मिळत होती, ते विमानतळ आता प्रत्यक्षात आकाराला येत असून तिथे प्रत्यक्षात प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या विमानांचं उड्डाण कधीपासून सुरू होणार यासाठीचा मुहूर्त अखेर ठरला आहे ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली असून याबाबत विमानतळाचं काम सोपवण्यात आलेल्या अदाणी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडूनदेखील दुजोरा देण्यात आला आहे.

कधी सुरू होणार विमान वाहतूक?

नवी मुंबईकरांची विमानतळावरून उड्डाणं सुरू होण्याची प्रतीक्षा १७ एप्रिल रोजी संपणार आहे. यासंदर्भात विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ एप्रिलपासून इथून प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा या विमानतळाची क्षमता दुप्पट असेल. पहिल्या टप्यात वर्षाला २ कोटी प्रवासी वाहतूकीची क्षमता असेल. टर्मिनल इमारतीचे ८४ टक्के काम पूर्ण झाले असून चारही टर्मिनल स्वयंचलित यंत्रणेद्वारे एकमेकांना जोडले आहेत”, असं ते म्हणाले.

अदाणी समूहाकडूनही तारीख निश्चित!

दरम्यान, अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी १७ एप्रिलच्या मुहूर्ताला दुजोरा दिला आहे. “आम्ही नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी १७ एप्रिलचं लक्ष्य निश्चित केलं आहे. विमान उड्डाण परवाना मिळाल्यानंतर ७० दिवसांत उद्घाटन केलं जाऊ शकतं. त्यानुसार ही तारीख आम्ही निश्चित केली आहे. ६ फेब्रुवारीला विमान उड्डाण परवाना मिळण्याची शक्यता आहे”, असं बन्सल यांनी नमूद केल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पहिले व्यावसायिक विमान ‘लँड’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिलं व्यावसायिक लँडिंग

दरम्यान, २८ डिसेंबर रोजी नवी मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर पहिल्यांदा एक व्यावसायिक विमान यशस्वीरीत्या उतरवण्यात आलं. विमानतळाच्या कार्यक्षमतेबाबतच्या चाचणीचा भाग म्हणून टेकऑफ आणि लँडिंगच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यातली ही चाचणी २८ डिसेंबर रोजी यशस्वी झाली. नवी मुंबई विमानतळावरील दोन धावपट्ट्यांपैकी एकीच्या विविध चाचण्या यापूर्वी पार पडल्या आहेत. रविवारी दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी धावपट्टीवर इंडिगो कंपनीचे ‘ए – ३२०’ विमान यशस्वीरित्या उतरले. नागरी हवाई वाहतुकीचे महासंचालक तसेच विविध तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांनीही चाचणीदरम्यान विमानातून प्रवास केला.