टाटा कंपनीच्या माघारीची शक्यता; तीन कंपन्या स्पर्धेत
नवी मुंबई विमानतळ उभारणीच्या कामाची निविदा भरण्याची अंतिम मुदत बुधवारी संपुष्टात येत असताना या स्पर्धेतील चौथा स्पर्धक ‘टाटा व्हिन्सी’ने माघार घेतल्याचे समजते. या अगोदर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, पर्यावरणाच्या परवानग्यांच्या कारणास्तव ‘जीएमआर’ने माघार घेत असल्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते, मात्र ते आता स्पर्धेत भाग घेत असून बुधवारी निविदा भरण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत मुंबई विमानतळाचे संचलन करणाऱ्या ‘जीव्हीके’ने ९ जानेवारी आधीच निविदा दाखल केली आहे. बुधवारी अन्य दोन निविदाकार निविदा भरणार आहेत.
नवी मुंबई विमानतळाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या स्पर्धेत यापूर्वी ‘जीव्हीके’, ‘जीएमआर’, ‘टाटा व्हिन्सी’ आणि ‘हिरानंदानी झुरीच’ या चार विमानतळ बांधकाम कंपन्या तांत्रिक निविदेत पात्र ठरल्या आहेत. आर्थिक निविदेत या चार कंपन्यांना निविदा दाखल करण्यासाठी ९ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र ‘जीएमआर’ने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, पर्यावरणाच्या काही परवानग्या, विमानतळपूर्व कामे न झाल्याचा आक्षेप घेऊन स्पर्धेतून माघार घेतल्याचे सिडकोला कळविले होते. ‘हिरानंदानी झुरीच’, ‘टाटा व्हिन्सी’ यांनी मुदतवाढ मागितली होती. त्यामुळे सुकाणू समितीने २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. ती बुधवारी संपत असताना नकार दिलेल्या जीएमआरनेही स्पर्धेत भाग घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्याच वेळी टाटाने या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
टाटा उद्योग समूहात निर्माण झालेल्या पेचामुळे ही माघार घेण्यात आल्याची चर्चा आहे. याला कंपनीकडून मात्र कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे बुधवारी हिरानंदानी झुरीच व जीएमआर या दोन कंपन्या निविदा दाखल करणार आहेत. जीव्हीकेने यापूर्वीच निविदा दाखल केली आहे. स्पर्धेत तीन स्पर्धक दाखल झाल्याने एका स्पर्धकामुळे जो पेच निर्माण होण्याची शक्यता होती तो आता होणार नाही.
तीन स्पर्धकांतून एकाची नवी मुंबई विमानतळ उभारणीसाठी निवड होणार आहे. ही निवड होण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. २२६८ हेक्टर जमिनीवर उभ्या राहणाऱ्या या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एकूण १५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. यापूर्वी हा विमानतळावरून पहिला टेक ऑफ डिसेंबर २०१९ मध्ये होईल असे जाहीर करण्यात आले होते, मात्र आता हा टेक ऑफ होण्यासाठी मे २०२१ उजाडणार आहे.
‘टाटा’चा दुजोरा नाही
टाटा उद्योग समूहात निर्माण झालेल्या पेचामुळे ही माघार घेण्यात आल्याची चर्चा आहे. याला कंपनीकडून मात्र कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.