गुरुवारी फळ बाजारात लागलेल्या आगीमुळे एपीएमसी बाजार समितीतील अग्नी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा, फळ, भाजीपाला, मसाला आणि दाणा बाजार या पाचही बाजार परिसरात एपीएमसी प्रशासनाकडून एकही अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. काही व्यापाऱ्यांनी स्वतंत्रपणे आपापल्या गाळ्यांमध्ये अग्निशामक सुरक्षा बसवल्या आहेत. परंतु त्यातही काही अग्निशामक यंत्रणा कालबाह्य झालेली आहे.
हेही वाचा- नवी मुंबई मनपा मुख्यालयात दारूच्या पार्ट्या? प्रशासनाकडून इमारतीची झाडाझडती
सर्वच बाजारात मोठ्या प्रमाणात शेतमाल येत असतो. विशेषतः भाजीपाला आणि फळ बाजारात अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात कागदी बॉक्स ,लाकडाच्या पेट्या, गवत इत्यादीं अधिक प्रमाणात दाखल होत असतात. याचाच प्रत्यय काल आला ,असून पुठ्ठ्यांमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. शिवाय या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून बसवण्यात आलेली अग्निशामक बाटले हे कालवाह्य झाले असल्याचे समोर येत आहे .त्यामुळे प्राथमिक उपाययोजनाच नसल्याने एपीएमसी बाजारात अग्नितांडव पाहायला मिळाला. भाजीपाला आणि फळ बाजारात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामही करण्यात आलेली आहे. या ठिकाणी परराज्यातील कर्मचारी त्याच ठिकाणी राहून जेवणही बनवत असतात. एकंदरीत एपीएमसी बाजारात जळाऊ वस्तू आणि ज्वलनशील पदार्थांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यामुळे अग्नि सुरक्षेच्या प्राथमिक उपाययोजनाच अस्तित्वात नसल्याने लहानशी आगीची ठिणगी ही महागात पडू शकते. गुरुवारी झालेल्या आगीच्या घटनेत सायंकाळची वेळ असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तीच आग मात्र एपीएमसी बाजार सुरू असताना वर्दळीच्यावेळी लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे एपीएमसी बाजारात अग्निसुरक्षा असणेही काळाची गरज आहे.
हेही वाचा- सराईत गुन्हेगार विकी देशमुख याच्या घरावर हातोडा, उत्तरप्रदेश पँटर्न नवी मुंबईत
अग्नि सुरक्षाकडे कानाडोळाच
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने मागील काही वर्षांपासून एपीएमसी बाजार समितीला बाजार समितीत अग्नि सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत वारंवार सूचना केलेल्या आहेत. सन २०१३, २०१५ २०१६, २०१७, २०१९, आणि २०२१ मध्ये महापालिका अग्निशमन दलाकडून वारंवार पत्रव्यवहार करून सूचना देण्यात आलेल्या होत्या. १५मार्च २०२१ला ही महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीव सुरक्षा अधिनियम २००६, २००९ नुसार भोगवटा मालक यांनीच अग्निसुरक्षा उपयोजना करणे बंधनकारक आहे . त्या अधिनियमानुसार एपीएमसीला पत्रव्यवहार करून अग्नी सुरक्षा उपाययोजनाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या . मात्र इतक्या वेळा सूचना पत्र देऊनही एपीएमसी कडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
हेही वाचा- सावधान !पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरातून वाहने जातायत चोरीला
व्यापाऱ्यांकडे असलेले अग्निशामक यंत्रणा कालबाह्य
पाच ही बाजारात एपीएमसी प्रशासनाच्यावतीने अग्निशामक यंत्रणा बसवण्यात आलेली नसल्याने व्यापारी वर्गाने आपापल्या गळ्यामध्ये अग्निशामक यंत्रणा बसवल्यात आहेत. परंतु यामध्येही बहुतांशी जणांचे अग्निशामक बाटले ही एक वर्षांपूर्वीच कालबाह्य झालेले निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाजारात कोणतीही आगीची घटना घडल्यास अग्निशामक दलाला तात्काळ जावे लागत आहे. एकंदरीत एपीएमसी प्रशासनाकडे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राथमिक उपाययोजना ही अस्तित्वात नाहीत. त्यामुळे भविष्यामध्ये ही एपीएमसी बाजार घटकांना आगीची घटना घडल्यास मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: गोवरचे नागरी आरोग्य केंद्र निहाय घरोघरी सर्वेक्षण
नवी मुंबई महानगरपालिकेला माझ्या कार्यकाळापासून सन २०१६ पासून सलग अग्नि सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत पत्रव्यवहार करून सूचना देण्यात येत आहेत. मात्र, वारंवार सूचना करून देखील एपीएमसीकडून कोणताही प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीव सुरक्षा अधिनियम २००६, २००९ नुसार एपीएमसीने अग्नी सुरक्षा उपाययोजना करणे बंधनकारक आहे, अशी माहिती वाशीचे विभागीय अग्निशामक अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.