नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या नैना प्रकल्पातील नगररचना योजना क्रमांक ८ ते १२ साठीच्या लवाद सुनावणीची अंतिम मुदत ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. सिडको मंडळाने ही मुदतवाढ जाहीर करताना सर्व संबंधित जमीनधारक, नागरिक व हितधारकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन केले आहे.
सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनामार्फत १० जानेवारी २०१३ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. या नियोजन प्रक्रियेत सध्या नैना क्षेत्रात एकूण १२ नगररचना योजना राबविण्यात येत आहेत. यातील योजना क्र. ८, ९, १०, ११ व १२ या टप्प्यातील लवाद सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. पूर्वी निश्चित केलेल्या सुनावणीमध्ये काही भूधारक सहभागी होऊ शकले नव्हते, म्हणून त्यांना अंतिम संधी म्हणून आधी ३० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींच्या विनंतीनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
सिडकोने स्पष्ट केले आहे की, ही अंतिम मुदत असून, त्यानंतर सुनावणीसाठी कोणतीही अतिरिक्त संधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे सर्व संबंधितांनी ही संधी साधून आपली मते, हरकती व प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह सीबीडी बेलापुर येथील रेल्वे स्थानक संकुलातील सिडको नैना कार्यालय, टॉवर क्रमांक १०, ७ वा मजला येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सिडकोने केले आहे.