नवी मुंबई : गुगल मॅपवर दाखवलेल्या दिशांवर भरवसा ठेवून कार चालवत असलेली महिला थेट खाडीत कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे बेलापूरमध्ये घडली. मात्र, प्रसंगावधान राखून सागरी सुरक्षा पोलिसांनी तत्काळ मदत करत महिलेचा जीव वाचवला.ही घटना शुक्रवारी (२५ जुलै) पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित महिला कारने उलवेच्या दिशेने जात होती. गुगल मॅपवर सरळ रस्ता दाखवला गेल्याने तिने पुलावरून न जाता, खालील पर्यायी मार्ग निवडला. मात्र, तो मार्ग थेट ध्रुवतारा जेट्टीकडे जात असल्याने तिची कार अनपेक्षितपणे थेट खाडीत कोसळली.
जवळच गस्त घालणाऱ्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ बोटीच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्यात वाहत असलेल्या महिलेचा जीव वाचवला. अपघातग्रस्त कारलाही क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. ही घटना थेट सागरी पोलिस चौकीसमोरच घडल्याने वेळेवर मदत पोहोचली आणि अनर्थ टळला.
गुगल मॅपवर अंधविश्वास नको; स्थानिक रस्त्यांची माहितीही तितकीच गरजेची
गुगल मॅपचा वापर शहरात आणि अनोळखी ठिकाणी मार्ग शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, यातील माहिती अनेक वेळा अद्ययावत नसते. गुगल मॅपवरील रस्त्यांची माहिती प्रामुख्याने उपग्रह चित्रं, वापरकर्त्यांच्या लोकेशन डाटा आणि गुगल मॅप्स कॉन्ट्रीब्युटर्स (म्हणजे स्वयंसेवक वापरकर्ते) च्या फीडबॅकवर आधारित असते. त्यामुळे नव्याने बांधलेले रस्ते, बंद झालेले मार्ग किंवा सार्वजनिकरित्या वापरता न येणाऱ्या मार्गांची माहिती वेळेवर अपडेट होत नाही.
ध्रुवतारा जेट्टीकडे जाणारा रस्ता हा सार्वजनिक वाहतुकीसाठी नसल्याने, तेथे प्रवास करण्याची शिफारस मॅपवर असूनही प्रत्यक्षात तो मार्ग धोकादायक आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दिशांची स्पष्टता नसेल, तर अशा चुकीच्या मार्गांमुळे मोठे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
गुगल मॅपमुळे कारसह महिला पडली खाडीत, नवी मुंबईतील घटनाhttps://t.co/2jrmCKw8Ui#Maharashtra #google #googlemap #Mumbai #navimumbai pic.twitter.com/1RxycxXlby
— LoksattaLive (@LoksattaLive) July 26, 2025
स्थानिक प्रशासन, गुगल आणि नागरिक यांचं संयुक्त सहकार्य आवश्यक
गुगल मॅपवरील माहिती अधिक अचूक होण्यासाठी स्थानिक प्रशासनानेही सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरी संस्थांनी रस्ते, पुलं, अडथळे, जेट्ट्या अशा बाबींची माहिती गुगल मॅपला पाठवली, तर या चुका कमी होऊ शकतात. त्याचप्रमाणे नागरिकांनीही चुकीच्या माहितीबाबत ‘फीडबॅक’ देणं गरजेचं आहे.
सागरी पोलिसांची तत्परता कौतुकास्पद
या संपूर्ण घटनेत सागरी सुरक्षा दलाच्या पोलिसांनी दाखवलेली सतर्कता आणि तत्परता खरोखरच स्तुत्य आहे. वेळेवर हस्तक्षेप झाला नसता, तर ही घटना जीवघेणी ठरली असती. शहरांत वाढत चाललेल्या गुगल मॅपवरील अवलंबनामुळे भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील, तर नागरिकांनी जागरूक राहणं आणि स्थानिक परिस्थितीची माहिती घेणं अत्यावश्यक आहे.