रेल्वे स्थानकाची प्रवेशद्वारे अडविली; पदपथावरही थांबे
सुनियोजित नवी मुंबई शहराची वाहतूक व्यवस्था रिक्षाचालकांनी बिघडवली आहे. मुक्त परवान्यांमुळे शहरात २२ हजरांपेक्षा जास्त रिक्षा झाल्या असून प्रवासी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू असून परिवहन विभागाच्या नियमांची पायमल्ली होत आहे. १४२ अधिकृत रिक्षा थांबे असताना सार्वजनिक ठिकाणी रिक्षांनी नाकेबंदी केल्याचे चित्र आहे. यामुळे प्रवाशांची अडवणूक सुरू आहे.
जागा मिळेल तिथे रिक्षा थांबलेली दिसत असून रेल्वे स्थानकांची प्रवेशद्वारे अडविली आहेत. गर्दीच्या वेळी या रिक्षांमुळे प्रवाशांना व पादचाऱ्यांना वाट काढत बाहेर पडावे लागत आहे. अनेक ठिकाणी पदपथावरच बेकायदा रिक्षाथांबे केले आहेत. या रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांना शिस्त लावावी अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
नेरुळ स्थानकाच्या पूर्वेला अभ्युदय बँक परिसरात तसेच सन्मान हॉटेलच्या समोरील बाजूस पथपदावरच रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे नेरुळ रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर सन्मान हॉटेलच्या दिशेने बाहेर पडताना प्रवाशांची मोठी अडचण होते. या ठिकाणी रिक्षाचालकांबरोबरच फेरीवालेही बसलेले असतात. त्यामुळे प्रवाशांची वाट अडवली जाते. याप्रमाणेच प्रत्येक उपनागरांत हीच स्थिती आहे.
शहरात १४२ अधिकृत थांबे असताना गणपती पाडा ते तुर्भे, ऐरोली ते वाशी, नेरुळ, सानपाडा, सीवूड, बेलापूर, कोपरखैरणे या विभागांत अंतर्गत मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा, सोसायटय़ांच्या प्रवेशद्वारानजीक, चौकाचौकांत बेकायदा रिक्षा थांबे झाले आहेत. महामार्गावरही काही ठिकाणी रिक्षांनी थांबे केले आहेत. वाशी, सानपाडा येथे महामार्गावर गावावरून प्रवासी गाडीतून उतरत नाहीत तोच तिथे रिक्षाचालकांची झुंबड उडते. एखादा नवीन प्रवासी असेल तर त्याला मनमानी भाडे आकारले जाते.
नियमांची पायमल्ली
कुठेही रिक्षा थांबवणे, गणवेश न घालने, मानमानी भाडे आकारणे आदी परिवहनने घालून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. वाहतूक विभाग व परिवहनने बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागाणी होत आहे.
रिक्षा चालकांनी शिस्तीचे पालन केले पाहिजे. नेरुळ स्थानकाबाहेर हव्या त्या ठिकाणी फेरीवाले बसतात. त्यामुळे रिक्षा थांब्यावर अडचण होत आहे. येथील फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केली पाहिजे.
-दिलीप आमले, अध्यक्ष, शिव वाहतूक सेना, नवी मुंबई</p>
शहरात फक्त १४२ अधिकृत रिक्षा थांबे आहेत. रिक्षाचालकांनी पदपथावर रिक्षा थांबवणे नियमानुसार योग्य नसून विनापरवाना रिक्षा थांब्यावर कारवाई करण्यात येईल.
-राजेंद्र सावंत, साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी.