नवी मुंबई: थायलंड, नेपाळ तसेच देशातील विविध भागातून आलेल्या महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या धाडीत तब्बल १७ महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी अटक संशयित आरोपींना न्यायालयाने चार तारखेपर्यंत पोलीस कोठडी फर्मावली आहे.

नवी मुंबईत अनेक ठिकाणी बॉडी स्पाच्या नावाखाली बळजबरीने महिलांच्या कडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशाच प्रकारे सीबीडी सेक्टर १७ येथील सिटी टॉवर मध्ये असणाऱ्या “मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा, या ठिकाणी वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी थेट धाड न घालता त्या अगोदर बनावट ग्राहक या स्पा मध्ये पाठवला. त्या बनावट ग्राहकांच्या कडून सहा हजार घेत महिलांना दाखवण्यात आले. त्यावेळी बनावट ग्राहकाने याबाबत माहिती देताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, राजश्री शिंदे,पोलीस हवालदार मांडोळे, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, पाटील, म्हात्रे, अडकमोल, पावडे, पोलीस नाईक भोये, तसेच चालक पोलीस हवालदार मोहिते यांनी या पथकाने धाड टाकली. यावेळी पाहणी करीत १७ पिडीत महिला आढळून आल्या. त्यांची सुटका करण्यात आली आहे.

या स्पाचे मालक मंगेश संजय बांदोडकर ( वय ३२ वर्षे) सफाईकामगार पंकज नारायण माने ( वय ४२ वर्षे ) या दोघांनी मिळून १७ पिडीत महिलांना बॉडी मसाज करण्याचे नावाखाली वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आले.

ज्या १७ महिलांची सुटका करण्यात आली त्यांच्या चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली असून त्यातील तीन विदेशी महिला नागरिक आहेत. एकूण १७ महिलांपैकी २ महिला हया थायलंड देशातील, १ नेपाळ देशातील, २ दिल्ली, २ उत्तर प्रदेश, १ पश्चिम बंगाल, १ गुजरात उर्वरित ६ महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी आहेत.

वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दोन्ही संशयित आरोपींच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दखल करून त्यांना २९ तारखेला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपींना चार तारखे पर्यंत पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे.