नवी मुंबई : सिडको महामंडळाने उलवे, खारघर, तळोजा, कळंबोली आणि द्रोणागिरी नोडमधील गृह संकुलांमधील ३३४ दुकानांच्या विक्रीसाठी ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री योजना जाहीर केली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
या दुकानांची आधारभूत किंमत कमीत कमी ५० लाख ते एक कोटी ३० लाखांपर्यंत असणार आहे. भविष्यात सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे अनेक गुंतवणूकदार सिडकोच्या इ लिलाव पद्धतीच्या दुकानांच्या खरेदीच्या योजनेत सहभाग घेतील अशी अपेक्षा सिडकोला आहे. या योजनेत दुकानांची विक्री झाल्यास सिडकोच्या तिजोरीत सुमारे दोनशे कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेतील दुकाने विविध आकारात असून, त्यांचे आधारभूत दर क्षेत्रानुसार निश्चित करण्यात आले आहेत.
बामनडोंगरी नोडमधील सर्वात लहान दुकान (१८.५० चौ.मी.) व सर्वात मोठे दुकान (४८.०४ चौ.मी.) यांचे आधारभूत दर प्रत्येकी २,७१,४३५ रुपये चौरस मीटर एवढे असल्याने इतके आहेत. या दरावरूनच लिलावाला सुरुवात होणार असून, विक्री ही या आधारभूत दराच्या वरच्या बोलीवर होणार आहे. तळोजा नोडमधील दुकाने याच दरांच्या कमी असणार आहेत.
अर्जासाठी संकेतस्थळ
संपूर्ण प्रक्रिया https://eauction.cidcoindia.com/ या सिडकोच्या अधिकृत ई-लिलाव संकेतस्थळावर पार पडणार असून, इच्छुकांनी तेथे भेट देऊन अधिक माहिती, अटी व शर्ती व अर्ज प्रक्रिया तपासावी.
वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी व अर्ज प्रक्रिया सुरू : २२ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वा.
ई-निविदा सादर करण्याची अंतिम मुदत : २१ ऑगस्ट २०२५, रात्री ११.५९ वा.
ई-लिलाव : २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६ वा.
निकाल जाहीर करण्याची संभाव्य तारीख : २६ ऑगस्ट २०२५, दुपारी ३ वा.