ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली ते महापे मार्गावर ठाण्याच्या दिशेने महानगर गॅसचे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम करत असताना या ठिकाणी असणारा एनएनएमटीचा बस स्टॉप अडगळीत टाकण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे गॅसलाइन टाकण्याच्या कामाचे खोदकाम करत असताना परिवहन आणि महानगरपालिकेला कळवणे अनिवार्य होते. मात्र महानगरने परवानगी न घेताच खोदकाम केले आहे. महापे सर्कल ते घणसोली रेल्वे स्टेशन या मार्गावर महानगर गॅस लिमिटेडने सध्या पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम सुरू केले आहे. मागील पाच दिवसांपासून हे खोदकाम सुरू आहे. रस्त्यावरील असणारा पदपथ आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहनचा महापे दर्गा येथे वर्षभरापूर्वीच उभारण्यात आलेला बस थांबा महानगर गॅसने खोदकाम करीत असताना काढून टाकला आहे. सदरचा बस थांबा नजीकच्या रस्त्यावर टाकून देण्यात आल्यांनतर प्रवाशांना बस थांबा नसल्याने याबाबतची माहिती देण्यात आल्यांनतर सदर ठिकाणी असणाऱ्या महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता विनापरवाना खोदकाम सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.
महानगर गॅसने खोदकाम करीत असताना त्याबद्दलची माहिती महानगरपालिकेला देणे गरजेचे होते, तर त्या ठिकाणी असणारा बस थांबा हटविण्यासंदर्भातदेखील परिवहनला पत्रव्यवहार करणे आवश्यक होते. तशी कोणतीही तसदी न घेता महानगर गॅसने खोदकाम सुरू केले आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिवसा अपघात होऊ नये यासाठी कर्मचारी तैनात केला जात नाही. तर रात्रीच्या वेळेला अपघात होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारची विद्युत रोषणाई केली जात नाही. त्यामुळे पनवेल, कल्याण व नवी मुंबईतील अनेक वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
एनएनएमटी कारवाई करणार
परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी महानगर गॅस ने पदपथावरील बस थांबा हटविण्यासंदर्भात कोणतेही पत्रक आले नसल्याचे स्पष्ट केले. बस थांबा हटविल्याने नियमावलीनुसार महानगर गॅसला पत्रक पाठवून नोटीस बजावण्यात येणार आहे.
महापे दर्गा नाका येथे महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून खोदकाम सुरू आहे. प्राप्त तक्रारीनुसार परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर असले तरी महानगर गॅसवर दंडात्मक कारवाई या कामाबाबत करण्यात येईल.
– शरद काळे, नमुंमपा उपअंभियता ठाणे बेलापूर मार्ग