नवी मुंबई : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस बाकी असताना सानपाड्यातील नागरिक मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विघ्नाला सामोरे जात आहेत. येथील अंतर्गत रस्ते दिवसेंदिवस अधिक खड्डेमय होत असून, रस्त्यांची अक्षरशः चाळण बनली आहे. यामुळे पादचारी, वाहनचालक यांना प्रचंड त्रास होत असून आता यानंतर गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांचीही गैरसोय होणार आहे. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी कामे केली नसल्याने सानपाडावासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने १५ मेपूर्वी रस्ते, गटारे, पदपथ, मलनिस्सारण वाहिन्या आणि कल्व्हर्टची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हे आदेश प्रत्यक्षात किती अमलात आले, यावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सानपाडा गाव, सिडको वसाहत, सानपाडा पोलीस ठाण्यासमोरील चौक, रेल्वे स्थानक परिसर आणि पाम बीच विभागात मोठ्या प्रमाणात खड्डे असून पावसात या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास सहन करणाऱ्या नवी मुंबईकरांना यंदाही तशाच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे गणरायाच्या आगमन-विसर्जन मिरवणुकांमध्ये अडथळे येण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे.
…तर आंदोलनाचा इशारा
या प्रकरणी आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून थेट नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना ई-मेलद्वारे सानपाड्यातील रस्त्यांवरील खड्डयांबाबत तक्रार केली आहे. तसेच गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी सानपाड्यातील खड्डे बुजवा; अन्यथा खड्ड्यांची छायाचित्रे सार्वजनिक प्रदर्शनातून दाखवत ‘मनसे स्टाइल’ आंदोलन करू,” असा इशारा मनसे विभागाध्यक्ष योगेश शेटे यांनी मनपा आयुक्तांना दिला आहे.
संबंधित विभागाच्या साहाय्यक अभियंत्यांशी बोलून यावर लवकरात लवकर खड्डे बुजवण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल. सागर मोरे, विभाग अधिकारी, तुर्भे