नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मंगळवारी सादर करण्यात येणार आहे. परिवहन समिती सदस्य निवडीच्या स्थगितीमुळे प्रथमच परिवहनचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पास यंदा सादर केला जात असल्याची माहिती मुख्य वित्त आणि लेखा अधिकाऱ्यांनी दिली.

नवी मुंबई शहरात मालमत्ता, पाणीपट्टी अशा प्रकारची कोणतीही दरवाढ नसलेला तसेच परिवहनमध्येही कोणतेही तिकीट दरवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी ३,४५५ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात महासभा, स्थायी समितीने वाढ सुचवून एकूण ४,०२० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

परिवहन समितीने ३०५ कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यात परिवहन सदस्यांनी ३० कोटी रुपयांची वाढ सुचवली होती. यंदाचा पालिकेचा अर्थसंकल्प ४ हजार कोटी रुपयांच्या आत राहणार आहे. परिवहनचा अर्थसंकल्प हा ३५० कोटी रुपयांपर्यंत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा कोणताही फुगवटा नसलेला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

यंदा पायाभूत सुविधांवर अधिक भर देणारा अर्थसंकल्प असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. यात सुसज्ज बहुमजली वाहनतळे, पर्यटनस्थळे, शहर सौंदर्यीकरणावर विशेष भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी ठोस तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. गतवर्षी ९१० कोटी १५ लाख आरंभीच्या शिलकीसह ३ हजार ४५५ कोटी ६४ लाख कोटींची जमा तसेच ३४५४ कोटी ७३ लाख खर्चाचा आणि ९१ लाख रुपये शिलकीचा मूळ अंदाज स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला होता. त्यात स्थायी स्थायी समिती व महासभेने वाढ सुचवून ४०२० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता.

परिवहनचा अर्थसंकल्प प्रथमच थेट ‘स्थायी’त

महापालिकेचा २०१९-२०चा सुधारित व १९२०-२१चा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असून मंगळवारी पालिका आयुक्त  स्थायी समितीकडे हा अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांनी सांगितले. तर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समिती सदस्य निवडीवर स्थगिती असल्याने प्रथमच परिवहनचा अर्थसंकल्प थेट स्थायी समिती समोर मांडण्यात येईल, असे परिवहन विभागाचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी नीलेश नलावडे यांनी स्पष्ट केले.