लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : महापालिकेची आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी पालिका प्रशासन स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे नियोजन करीत आहे. यासाठी मंगळवारी एक बैठक झाली असून यात पालिका अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय झाला. यामुळे पालिकेला पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळही प्राप्त होणार आहे.

पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय ३०० खाटा क्षमतेचे असून या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाचे नियोजन असून नेरुळ व ऐरोली येथील पालिका रुग्णालयांची क्षमताही वाढविण्यात येणार आहे. या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पालिका आयुक्तांनी घेतली. यात अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके व इतर अधीक्षक व अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालयात पदवी अथवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांची समिती गठीत करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याप्रमाणेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ असणार आहेत.

हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक रुग्णालये व त्यामधील सुविधा आपल्याकडे उपलब्ध असून त्यादृष्टीने या सेवेचे अद्ययावतीकरण करणे तसेच आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करणे याकडे लक्ष केंद्रित करण्याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी  महाविद्यालयासाठी आवश्यक शैक्षणिक इमारत आणि हॉस्टेल उभारण्याविषयी नियोजन करण्यात आले. या उपक्रमाचा पालिकेवर खर्चाचा किती भार पडू शकतो यावरही प्राथमिक चर्चा करण्यात आली.

शहरात महापालिकेची आरोग्यसेवा अधिक भक्कम करण्यासाठी व आरोग्यसेवेतील आवश्यक मनुष्यबळ प्राप्त होऊन नागरिकांना चांगल्या आरोग्यसेवा पुरवण्यासाठी पालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी तज्ज्ञांची नियोजन समिती गठीत करण्यात येणार आहे.
-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका