नवी मुंबई : गेल्या ४८ तासांहून अधिक काळ पडणाऱ्या मुसळधार पावसाने नवी मुंबई शहराला अक्षरशः वेठीस धरले आहे. मंगळवार (१९ ऑगस्ट) सकाळपर्यंत शहरात सरासरी १८५ मिमी पावसाची नोंद झाली असून, अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. पाणी तुंबल्याने रस्ते, गल्ली-बोळ, घरांच्या परिसरात पाणी शिरले असून नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतील प्रशासनाचे नियोजन मुसळधार पावसापुढे अपुरे ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
झाडे कोसळल्याच्या ७ घटना
महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत सात ठिकाणी झाडे कोसळली आहेत. सोमवार (१८ ऑगस्ट) ते मंगळवार (१९ ऑगस्ट) दरम्यान, शहरात सीबीडी सेक्टर २६ मधील विद्या प्रचारक हायस्कूलजवळ, वाशी सेक्टर-९ बस डेपोच्या मागील भागात, नेरुळ सेक्टर-४२ डी-मार्टजवळ, नेरुळ सेक्टर-३६, सानपाडा सेक्टर ५ मधील हरी निवास समोर, वाशी सेक्टर १६ मधील सेंट लॉरेन्स शाळेजवळ व वाशी सेक्टर २९ येथे झाड उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
वाशी सेक्टर २९ येथे गुलमोराचे मोठे झाड रस्त्यावर कोसळून लाल रंगाच्या ‘क्रेटा’ गाडीवर आदळले. अग्निशमन दलाने सॉ-कटरच्या साहाय्याने झाडाचे तुकडे करून गाडी बाहेर काढली व रस्ता मोकळा केला. तर वाशी सेक्टर १० मधील सिल्वर को-ऑप हाऊसिंग सोसायटी परिसरात आंब्याचे झाड मुळासकट कोसळून अंजुमन हायस्कूलच्या कंपाऊंडवर पडले. त्यामुळे शाळेच्या मैदानात अडथळा निर्माण झाला होता. मात्र, बचाव पथकांनी झाडाचे तुकडे करून धोका दूर केल्याची माहिती वाशी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तरुण वाहून गेला
सोमवारी (१८ ऑगस्ट) वाशी सेक्टर २९ परिसरात ३४ वर्षीय तरुण नाल्यात पडून वाहून गेला. मोठ्या पावसामुळे नाला ओसंडून वाहत असल्याने त्याचा पाय घसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र २४ तास उलटूनही त्या तरुणाचा शोध लागलेला नाही. स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
वाहतूक विस्कळीत, नागरिकांची तारांबळ
पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. ठाणे–पनवेल महामार्गासह बेलापूर, वाशी, नेरुळ व ऐरोलीतील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीला कोंडी निर्माण झाली. बस व ऑटो रिक्षा वेळेवर न आल्याने प्रवाशांना पावसात पायपीट करावी लागली आहे.
प्रशासन सज्ज असल्याचा दावा
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, शहरात पाणी साचलेल्या भागात तातडीने पंप बसवून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी (टोलफ्री क्रमांक १८००२२२३०९/१०) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.