नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील जुन्या सामाजिक संस्थांना कायमस्वरुपी जागा मिळण्याबाबत शहरातील सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी वनमंत्री नाईक यांंनी डॉ.कैलास शिंदे यांच्याशी चर्चा करून शहराची सामाजिक, साहित्य, कला संस्कृती जोपासणाऱ्या जुन्या संस्थांना दीर्घमुदतीवर कायमस्वरुपी जागा मिळण्याबात चर्चा केली. तसा प्रस्ताव पालिकेकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या सामाजिक संस्थांबाबत धोरणात्मक निर्णय होणार असून आहे.

नवी मुंबई शहरात अगदी सिडको काळापासून शहरातील साहित्य, संस्कृती, कला जोपासना करण्याचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना भाडे तत्त्वावर दिलेल्या वाशी सेक्टर ३ येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीभवनातील जागा तात्काळ रिकामी करण्याचे लेखी पत्र देण्यात आले होते. या संस्थाबाबत पालिकेने घेतलेल्या भूमिकेमुळे पालिकेच्या कारभाराबाबत सामाजिक व साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रात मोठा संताप व्यक्त करण्यात येत होता. पालिकेने जुन्या संस्थांना कायमस्वरुपी भाडेतत्वावर जागा देण्याची मागणी या संस्थांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार गुरुवारी झालेल्या बैठकीत पालिका प्रशासनानेही सकारात्मकदृष्ट्या कार्यवाही सुरू केली आहे. या बैठकीत जुन्या संस्थांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जुन्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेत मालमत्ता उपायुक्त भागवत डोईफोडे यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

नवी मुंबई शहरात मागील अनेक वर्षे टाऊन लायब्ररी, नूतन महिला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, न्यू बॉम्बे म्युझिक अँड ड्रामा सर्कल, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, नवी मुंबई स्पोर्टस क्लब, अलर्ट इंडिया यासह विविध सामाजिक संस्थानी वनमंत्री गणेश यांना लेखी निवेदन दिले होते. आता गणेश नाईक यांच्या आयुक्तांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जुन्या संस्थांचा जागेचा मार्ग मोकळा होणार आहे.

नवी मुंबईतील जुन्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या संस्था जगल्या पाहिजेत या मताचा मी आहे. वाशीतील समाज मंदिरात या संस्थांच्या कार्याची सुरुवात झाली. संस्थांचे आणि त्यामध्ये काम करणाऱ्या नवी मुंबईकरांचे योगदान कुणालाही विसरता येणार नाही. या संस्थांना कायमस्वरूपी जागा मिळेल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. यासंबंधीच्या सूचना मी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. गणेश नाईक, वन मंत्री

नवी मुंबई शहरात जुन्या संस्थाना ११ वर्षांच्या भाडेतत्वावर जागा मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. गणेश नाईक यांच्या समवेत झालेल्या चर्चेतून आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. निविदा प्रक्रिया न राबवता जुन्या संस्थांबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचा शब्द वनमंत्री नाईक यांनी दिला आहे. तसेच पालिकाही सकारात्मक असून शहराची संस्कृती जपणाऱ्या संस्थांना न्याय मिळणारच असा विश्वास वाटत आहे. अमरजा चव्हाण, सचिव, नवी मुंबई स्वयंसेवी संघटना

मुंबईची निर्मिती होत होती तेव्हापासून या संस्था कार्यरत आहे. केवळ रस्ते आणि उड्डाणपूल उभारून शहराला चेहरा मिळत नसतो. शहरातील संस्था त्यामध्ये कार्यरत असणारी माणसे यांच्या योगदानाकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. कोणत्याही शहराला ओळख मिळवून देण्यात तेथील माणसे आणि तेथील संस्थांचे काम मोलाचे असते. या संस्था जगायला हव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. नेत्रा शिर्के, माजी स्थायी समिती सभापती, नवी मुंबई महापालिका