नवी मुंबई : घणसोली, सेक्टर ७ येथील सिम्प्लेक्स परिसरातील सात सोसायट्यांच्या शेकडो संतप्त रहिवाशांनी पुनर्विकासाच्या प्रक्रियेतील प्रशासकीय दिरंगाईविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आज, (सोमवार) दुपारी थेट नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या दालनावर थेट धडक देत तीव्र निदर्शने केली. अनेक वर्षांपासून अतिधोकादायक ठरलेल्या या इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या जीविताच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत आयुक्तांना जाब विचारला.

या निदर्शनात सिम्प्लेक्स परिसरातील श्री गणेश कृपा, माऊली कृपा, कै. शिवाजीराव पाटील, कै. आमदार अण्णासाहेब पाटील, श्री गुरुदेव दत्त, श्री हनुमान आणि ओम साई धाम या सात सोसायट्यांतील शेकडो नागरिक एकत्र आले होते. त्यांनी सोमवारी साडेबारा वाजता आयुक्तांच्या दालनात धडक दिली. यावेळी निदर्शने करताना रहिवाशांनी प्रशासनाकडे पुनर्विकासाला तात्काळ मंजुरी देऊन स्ट्रक्चरल ऑडिटच्या निष्कर्षांनुसार शहरी नूतनीकरण क्लस्टर (URC) पात्रतेचा अहवाल जारी करण्याची मागणी केली. अन्यथा रस्त्यावर उतरून मोठ्या आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला.

सन २००४ मध्ये सिडकोकडून बांधण्यात आलेल्या या इमारतींमध्ये प्रामुख्याने अल्प उत्पन्न गटातील नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र गेल्या वीस वर्षांत इमारतींची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात भिंती गळणे, छताचे प्लास्टर कोसळणे, घरात ओलसरपणा, अंधार, सांडपाण्याच्या वाहिन्यांमधील बिघाड अशा समस्या कायम आहेत. परिणामी ३२६४ कुटुंबांपैकी सुमारे १२०० ते १३०० कुटुंबांनी पडझडीच्या भीतीने इमारती सोडल्या असून उर्वरित रहिवासी जीव मुठीत घेऊन या जीर्ण घरांत राहत आहेत.

रहिवाशांनी आयआयटी खरगपूर, व्हीजेटीआय (VJTI) आणि इतर तज्ञ संस्थांकडून इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले आहे. या सर्व अहवालांमध्ये इमारती “मानवी वास्तव्यास अयोग्य आणि अतिधोकादायक” असल्याचे स्पष्ट नमूद आहे. तसेच युडीसीपीआर २०२० च्या १४.८.१ (F) कलमानुसार या इमारती “शहरी नूतनीकरण क्लस्टर (Urban Renewal Cluster – URC)” पात्रतेत बसतात, असा निष्कर्ष अहवालांत दिला आहे.

तरीदेखील नगररचना विभागाने पाहणी करूनही कोणतीही ठोस कारवाई केली नाही. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, राजकीय दबावाखाली त्यांच्या फाईल्स मुद्दाम दडपल्या जात असून, पुनर्विकासाच्या प्रक्रियेला मनपा प्रशासनाकडून विलंब केला जात आहे.

या रहिवाशांमध्ये प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी असून, हा विलंब सुरू राहिल्यास पुढील टप्प्यात मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.