नवी मुंबई : रोजच्या व्यवहारात आंतरजाल वापर प्रचंड वाढला आहे. अगदी आता संकेत स्थळावरून संबंधित तज्ञाला आजाराची लक्षणे सांगून उपचार हि करून घेतले जात आहेत. मात्र असे करताना ज्या संकेत स्थळावरून नामांकित कंपनी द्वारे आपण आर्थिक व्यवहार करीत आहोत ते संकेत स्थळ खरेच संबंधित कंपनीचे आहे. कि बनावट आहे याची खात्री करून घेणे अवाश्यक आहे. असे न केल्यास आर्थिक फटका बसू शकतो. असे उदाहरण नवी मुंबईत समोर आले आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तळवळी नाका येथे राहणारे चेतन रमेश पाटील यांनी वडिलांच्या आजारपणाबाबत आंतरजाल वरून माहिती घेतली त्यावेळी त्यांनी पतंजली नावाचे संकेत स्थळावर माहिती घेत असताना त्यांना नेमका काय आजार काय ?लक्षण काय? वय किती ? अशी माहिती विचारण्यात आली. हि सर्व माहिती संकेत स्थळावर दिलेल्या ठिकाणी पाटील यांनी भरून अर्ज पुढे पाठवून दिला. त्यानंतर पाटील यांना फोनवर संबंधित व्यक्तीने संपर्क करून आजाराच्या उपचार पद्धतीनेही माहिती दिली. तसेच उपचारानंतर रुग्ण बरा होईल अशी खात्री देत विश्वास संपादन केला.
पूर्ण उपचाराचा एकूण खर्च ७ लाख २५ हजार ३३० रुपये सांगण्यात आला. तसेच हे पैसे कुठल्या बँक खात्यात टाकावयाचे आहे. त्याची माहिती देण्यात आली. पतंजली संकेत स्थळावर संपर्क केल्यावर ज्या व्यक्तीचा फोन आला त्याने सांगितल्या प्रमाणे सुरवातीला एक लाख, दुसऱ्यांदा १ लाख ४० हजार, एक लाख २५ हजार, ९१ हजार ५३० – १ लाख ३५ हजार,, १ लाख ३३ हजार ३०० असे एकूण ७ लाख २५ हजार ३३० रुपये ऑन लाईन भरण्यात आले. हा सर्व व्यवहार १४ जुलै ते १९ जुलै दरम्यान झाला. ठरलेले पूर्ण पैसे अदा करूनही उपचार सुरु केलेही नाहीत आणि पैसे परत देण्यात आले नाहीत.
आपण उपचार सेवा करू शकत नाहीत हे माहिती असूनही पैसे स्वीकारले आणि परत देण्यास टाळाटाळ केल्याने शेवटी पाटील यांनी याबाबत शुक्रवारी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणी पाटील यांच्याशी फोन वर संपर्क करणाऱ्या मिश्रा नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.