नवी मुंबई : बाजारभावापेक्षा कमी दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाईन मिळतात म्हणून ऑनलाईन वस्तू मागवण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र अनेकदा फसवणूक झाल्याचे प्रकार हि समोर येत आहेत. त्यामुळे कुठल्या साईट वरून मागवावे याचे चर्चाचर्वीचन अनेकदा नेहमीच्या गप्पात विषय रंगतो.
ऑनलाईन वस्तू मागवण्यात फसवणूक झाल्याचा प्रकार नवी मुंबईत नुकताच समोर आला आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने ऍमेझॉन वरून लॅपटॉप मागवला होता, मात्र डिलिव्हरी इलेक्ट्रॉनिक वजन काट्याची झाली. हा प्रकार लक्षात येताच डिलिव्हरी बॉयच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नेरुळ सेक्टर १५ येथे प्रदीप मेहता राहतात. त्यांनी २९ एप्रिलला ऍमेझॉन वरून ३५ हजार रुपये किमतीचा लिनिओ कंपनीचा लॅपटॉप मागवला होता. हा लॅपटॉप १ मे रोजी त्यांच्या घरी डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने आणून दिला. नेमके यावेळी प्रदीप स्वतः कामानिमित्त पुण्याला गेले होते. फोन द्वारे ओटीपीची सांगत त्यांच्या पत्नीने लॅपटॉप सोडवून घेतला. त्यावेळी ऍमेझॉन कंपनी कडून तुम्हाला लॅपटॉप डिलिव्हरी झाला असा संदेश हि पाठवला होता.
फिर्यादी प्रदीप हे पुण्याहून नवी मुंबईत आल्यावर दोन तारखेला लॅपटॉपचा बॉक्स उघडून पहिले असता त्यात लॅपटॉप ऐवजी बॉक्स मध्ये काळ्या काचेचा वजन काटा आढळून आला. या प्रकरणी त्यांनी ऍमेझॉन कंपनीच्या मेल वर तक्रार दाखल केली होती. मात्र दोन महिने उलटूनही त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाहीच , शिवाय पैसेही परत केले नाहीत, असा दावा त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
त्यामुळे शेवटी त्यांनी या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात रितसर तक्रार अर्ज दाखल केला. त्या तक्रार अर्जाची दखल घेत नेरुळ पोलिसांनी २४ जुलैला डिलिव्हरी बॉयच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बिपीन तुतूरवाड तपास करीत आहेत.