नवी मुंबई – सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेणधर या पहिल्या मार्गावरील मेट्रो सेवेला सुरूवातीची अवघी दोन वर्षे पूर्ण होत असताना तब्बल १ कोटी १५ लाख २८ हजार २९७ प्रवाशांचा टप्पा पार करण्याचा मोठा विक्रम नोंदवला आहे. सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशासाठी मेट्रो टीमचे अभिनंदन केले.

बेलापूर–पेणधर मार्गिका सिडकोने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित केली असून दोन वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच गेल्या वर्षी १२ जानेवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे राष्ट्राला समर्पण करण्यात आले. या मार्गामुळे सीबीडी बेलापूर, खारघर आणि तळोजा यांना उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक उपलब्ध झाली आहे.

प्रवाशांच्या मागणी नंतर आणि मेट्रो सेवेमध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिडकोने वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सध्या मेट्रो दर १० मिनिटांनी गर्दीच्या वेळेत आणि १५ मिनिटांनी सामान्य वेळेत उपलब्ध आहे. तसेच प्रवासी सुलभतेसाठी तिकिटदर कमी करून किमान १० रुपये तर कमाल ३० रुपये इतका ठेवण्यात आला आहे. या सोयींमुळे प्रवासीसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून अवघ्या दोन वर्षांत १ कोटींपेक्षा जास्त प्रवासी सेवा घेऊन गेले आहेत.

पुढील टप्प्यात नवी मुंबई मेट्रो लाईन १ बेलापूरहून थेट एनएमआयए (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) पर्यंत वाढवली जाणार आहे. तसेच लाईन २ पेंडहर–तळोजा औद्योगिक वसाहतमार्गे कळंबोली आणि कामोठेद्वारे पुन्हा एनएमायएपर्यंत नेण्याची योजना असून तिची एकूण लांबी अंदाजे १६ किलोमीटर असेल.

दरम्यान, सिडकोने मुंबई मेट्रो लाईन ८ चा डीपीआर—जो विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असणार आहे. सध्या राज्य शासनाच्या मंजुरीसाठी हा डीपीआर पाठविण्यात आला आहे. ही लाईन दोन्ही विमानतळांदरम्यान गतिमान, अखंड आणि आधुनिक जोडणी उपलब्ध करून देणार असून भविष्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणार आहे.

मागील दोन वर्षांच्या कालावधीत मेट्रो सेवेच्या प्रवासी संख्येने गाठलेला एक कोटींहून अधिक आकडा हा मेट्रो सेवेला लाभत असलेला प्रवाशांच्या उदंड प्रतिसादाचे प्रतीक आहे. या मेट्रो मार्गामुळे बेलापूर, खारघर व तळोजा परिसरातील कार्यालये, गृहसंकुले व उद्योग-व्यवसाय यांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी लाभली आहे. नवी मुंबईकरांनी सिडकोच्या मेट्रो सेवेप्रति दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.” – विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सिडको.